पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टिका करताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना प्रवीण दरेकरांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलं आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांना योग्य शासन द्या, असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 


प्रवीण दरेकर काय म्हणाले होते? 


आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. "या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे.", अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती.


राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल अन् थोबाड रंगवू शकतो : रुपाली चाकणकर 


राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांना खडे बोल सुनावले आहेत. "आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येतंय. संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांच्या कैवारी आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न करतायंत, आज मला त्यांची कीव येतेय. त्या अशा पक्षात काम करतायत, ज्यांच्या पक्षाचा हा विचार आहे. तुमच्या बोलण्यामुळं तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं, याची जाणीव ठेवावी."


ज्यांच्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झालाय, त्यांना शिक्षा देऊ; राष्ट्रवादीचा पलटवार 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी टीका केली. पण त्या टीकेची पातळी खालच्या दर्जाची होती. त्यांनी आक्षेपार्ह्य भाषा वापरलेली. त्यामुळे ज्यांच्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झालाय, त्यांना चांगलीच शिक्षा देऊ, असा पलटवार राष्ट्रवादीनं केला आहे. 


लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची राजकारणात एन्ट्री; 16 सप्टेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश


आपल्या अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबर रोजी सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. सुरेखा पुणेकर यांच्यासोबतच इतर 16 कलाकारही मनगटावर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेखा पुणेकर यांनी विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. एका मेळाव्यात त्या शिवसंग्रामच्या व्यासपीठावरही बसल्या होत्या. दरम्यान, याआधीही प्रिया बेर्डे, विजय भाटकर, आनंद शिंदे यांच्यासह अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. 


गेल्या अनेक महिन्यांपासून सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाबाबत बोलताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, "चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभाग मुंबई अध्यक्ष मनोज शंकर व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 16 सप्टेंबरला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. मी आतापर्यंत कलेची सेवा केली. आता मला राजकारणातून जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवायेच आहेत. त्यामुळे 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मला प्रवेश घ्यायचा आहे."