कल्याण : दोन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाचे डोकं विजेच्या खांबावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगर परिसरात घडली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर पाच भागांतील साईनाथ कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर शेजारी आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा संपूर्ण थरार सिसिटीव्हीत कैद झाला आहे. फहिम शेख असं मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात फहिमच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत सोनू गुप्ता या आरोपीला याला अटक करण्यात आली आहे.


फहिम आणि सोनू हे दोघे एकाच जीन्स कंपनीत काम करत होते. फहिम याने सोनूकडून 400 रुपये उसने घेतले होते. काही दिवस झाले आपले पैसे परत न केल्यामुळे सोनूने फहिमकडे पैसे मागण्याचं ठरवलं. सोनूने आज सकाळी फहिमकडे उसने घेतलेले पैसे परत मागितले. सोनूने पैसे मागितल्यामुळे फहिमला राग आला. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. काही वेळाने वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.


हाणामारीत सोनूने फहिमला धक्का दिला. सोनूने ढकलल्यामुळे फहिम मागे असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळला. फहिमला डोक्याला गंभीर दुखापत झाली. विजेच्या खांबावर जाऊन आदळल्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीत फहिमचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीत झालेल्या दुखापतीमुळे फहिमचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोस्टमॉर्टम केल्यानंतरच मृत्यूच कारण स्पष्ट होईल असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सोनू आणि फहिमचं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असलेला त्यांच्या मित्रांसमोरचा हा प्रकार घडला. यावेळी फहिमचा भाऊही तिथे उपस्थित होता. फहिमच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यानंतर पोलिसांनी सोनूला अटक केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :