Kalyan-Dombivli Latest Crime News Update : कल्याण डोंबिवली महापालिका व पालिका अधिकाऱ्याच्या नावाने खोट्या सह्या आणि शिक्के तयार करुन इमारतीच्या परवानगी भासवून रेरा प्राधिकरणचे प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी एसआयटीने संबंधित बिल्डर विरोधात फास आवळण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी एस आय टी ने  खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्या एका महिलेसह  पाच जणांना अटक केली आहे. प्रियंका रावराणे मयेकर, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन , कैलास गावडे अशी या पाचही आरोपींची नावे आहेत.  एसआयटीच्या या कारवाईमुळे कथित बिल्डर मंडळींचे धाबे दणाणले आहेत. लवकर या प्रकरणाचा सूत्रधार व त्याचे साथीदार बिल्डरांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


कल्याण डोंबिवली महापालिकेकडून खोट्या सही शिक्क्याच्या आधारे बांधकाम परवानगी मिळाली असल्याचे भासवून काही बिल्डरांनी रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रकल्पांचे प्रमाणपत्र मिळविले होते. या प्रकरणी माहिती अधिकारात वास्तू विशारद संदीप पाटील यानी ही बाब उघड केली. या प्रकरणी चौकशीची मागणी महापलिकेकडे केली. त्याचबरोबर उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली. महापलिकेने या प्रकरणात डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण मधील तब्बल 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासाकरीता पोलिस आयुक्तांनी एसआयटी नेमली. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरु असताना सात बिल्डरांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी चार जणांचा अर्ज फेटाळला. तीन जणांना तीन आठवडय़ाकरीता अंतिम जामीन मंजूर केला होता. मात्र एसआयटीने 65 पैकी 40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया नुकतीच केली होती. त्यानंतर आज एसआयटीने खोटी कागदपत्रे तयार करणार्या पाच जणांना अटक केली आहे. 


या प्रकरणी  प्रियंका रावराणे मयेकर, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे,जयदीप त्रिभुवन , कैलास गावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बनावट बांधकाम प्रमाणपत्राचा वापर करत अनधिकृत विकास कामे करणारे जमीन मालक , विकासक,ठेकेदार ,यांची माहिती मिळवून संबधिताना प्रत्यक्षात बनावट बांधकाम प्रमाणपत्र तयार केली. तसेच त्या बोगस कागदपत्रांच्या आधारे महा रेरा प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची या पाच जणांची भूमिका निष्पन्न झाली आहे. या पाच आरोपींनी ही कागदपत्र कुठून व कशी बनवली याचा तपास पोलीस करत आहेत. एसआयटीच्या या कारवाईमुळे मात्र येथील बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. 


आणखी वाचा : Crime : गुंगीचं औषध टाकून केलं असं कृत्य की... मित्रांनीच इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला 40 लाखांना लुटलं, एकाला कोल्हापुरातून अटक