कल्याण : मुंबई लोकलमध्ये अनेकजण विना तिकीट प्रवास करत असतात. अशा प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी टीचींची नियुक्ती करण्यात आली आहे. पण बोगस प्रवाशांना पकडण्यासाठी जर बोगस टीसी उभारले असतील तर? हे बोगस टीसी प्रवाशांना लुटून त्यांच्याकडून पैसे वसूल करतात, तसेच रेल्वेलाही चुना लावण्याचं काम करतात. अशाच दोन बोगस टीसींना (Two Bogus TC arrested by Railway Police) कसारा या ठिकाणी रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 


काळा कोट आणि पांढरा शर्ट, हातात पावती बूक घेऊन दोन बोगस टीसी प्रवाशांची तिकीट तपासणी करत होते. मात्र या दोघांवर खऱ्या टीसीची नजर होती, त्याने दोघांना आयकार्डची विचारणा केली. त्या बोगस टीसींकडे आयकार्ड नसल्याचं लक्षात येता तत्काळ याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. संदीप पवार आणि रोहिदास गायकवाड अशी या आरोपींची नावे आहेत. दोघे कधीपासून रेल्वेची फसवणूक करीत आहेत याचा तपास आता पोलीस करीत आहेत.


रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म  क्रमांक चारवर रेल्वे कॅन्टीनच्या समोर दोन टीसी प्रवाशांचे तिकीट चेक करत होते. याच दरम्यान ड्युटीवर असलेल्या एक टीसीची नजर या दोघांवर गेली. दोघे स्वतःला टीसी असल्याचं सांगत होते. मात्र दोघांची वागणूक संशयित होती. या दोघांकडे असलेलं आयकार्ड चेक केलं गेलं. त्यांच्याकडील आयकार्ड हे बनावट असल्याचं लक्षात आले. त्यांच्याकडे इतर काही बनावटी कागदपत्र  सापडले. 


दोघे स्वतः टीसी असल्याचं सांगत प्रवाशांची तिकीट चेक करण्याच्या बहाण्याने फसवणूक करत होते. याची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. रेल्वेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. संदीप पवार आणि रोहिदास गायकवाड दोघे  कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात राहतात. हे दोघे कधीपासून असा प्रकारे रेल्वेची फसवणूक करीत होते याच्या तपास कल्याण जीआरपीच्या महिला पोलीस अधिकारी अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याआधी अनेक बोगस टीसी म्हणून नागरिकांना लुबाडणाऱ्या भामट्यांना कल्याण जीआरपीने अटक केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :