Ankita Bhandari Murder Case: उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणातील (Ankita Bhandari Case) गुंतागुंत वाढत चालली आहे. अंकिता भंडारीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, तिचा मृत्यू हा गुदमरणे आणि पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, शरीरावर जखमांचे व्रणही आढळून आले आहेत. या जखमांबाबतचा खुलासा पूर्ण अहवालात स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अंकिताचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. त्यांनी तिच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार थांबवले आहेत.


अंकिता भंडारीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार होते.  शवविच्छेदन अहवालानंतर ते रोखण्यात आले आहेत. प्रशासनाकडून भंडारी कुटुंबीयांची समजूत घालण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तर, अंकिताच्या कुटुंबीयांनी सरकारच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अंकिताच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी रिसॉर्ट तोडण्यात आले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. 


फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी 


अंकिता भंडारीचा मृतदेह शनिवारी चिला पॉवर हाऊसच्या कालव्यात आढळला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी आणि भावाने मृतदेहाची ओळख पटवली. अंकिताचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणातील आरोपी भाजपशी संबंधित आहेत. 


उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन केले आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे. 


प्रकरण काय?


मृत अंकिता भंडारी ही पुलकित आर्य याच्या रिसॉर्टमध्ये काम करत होती.  अचानकपणे ती बेपत्ता झाल्याने पोलिसांमध्ये तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. अखेर पाच दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे दिसून आले.  त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. यामध्ये पुलकित आर्य हा भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. 


वेश्या व्यवसायासाठी दबाव?


एसआयटीची जबाबदारी डीआयजी पी.आर. रेणुका देवी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी मृत अंकिता भंडारीच्या व्हॉटस अॅप मेसेजची चौकशी सुरू केली आहे. या चॅटमधून काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासानुसार, अंकितावर रिसॉर्टमध्ये 'विशेष सेवा' देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. अंकिताने या कामाला विरोध केला होता. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.