कल्याण: बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून सुमारे 27 लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला. अवघ्या 48 तासात पोलिसांनी या टोळी मधील दोन आरोपींना अटक केली आहे. सरफुद्दीन खान, उमेश प्रजापती अशी अटक आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड आणि चार गाड्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे हे चोरटे चोरीसाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करायचे.


हरयाणामधील या टोळीचे पाच सदस्य चोरी करण्याआधी हरयाणाहून मुंबई येथे विमानाने आले. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून ते एकमेकांच्या संपर्कात चोरी केल्यानंतर ते पून्हा विमानाने पळून गेले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसाना यश आले असून उर्वरित फरार पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान याच टोळीने खारघर येथील एटीएम अशाच पद्धतीने फोडून चोरी केल्याचं निष्पन्न झाले आहे. 


कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात असलेल्या बँक ऑफ इंडियाची दोन एटीएम आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास काही चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरने फोडून एटीएम मधील 27 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावार स्प्रे मारत चोरी केली. या घटनेमुळे पोलीसही चक्रावले होते. कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केला. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली. तपासा दरम्यान ही सात जणांची टोळी असल्याचे निष्पन्न झाले. 


यामधील दोन आरोपी कल्याण शिळ फाटा परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उमेश प्रजापती, सरफुद्दीन खान या दोन चोरट्यांना सापळा रचत शिळफाटा परिसरातून अटक केली. तर त्यांच्या तपासा दरम्यान त्याच्या इतर पाच साथीदारांनी नावे उघड झाली. हे सर्वजण हरयाना राज्यातील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या पाच जणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी अटक आरोपींकडून पोलिसांनी दोन लाखांची रोकड आणि चार गाड्या हस्तगत केल्या आहेत. तसेच त्यांनी नवी मुंबई खारघर येथील एका एटीएममध्ये अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड झाले आहे. ही आंतरराज्य टोळी असून त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील अशा प्रकारे चोरी केली असावी असा संशय व्यक्त करत फरार पाच जणांचा शोध सुरू असल्याचे एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितलं


कशी करायचे चोरी?
कल्याणात चोरी करण्यापूर्वी उमेश, सरफुद्दीनला एटीएममध्ये चोरी कशी करायची, एटीएम फोडण्यासाठी कोणत्या हत्यार आणि तंत्राचा वापर करायचा याची माहिती देण्यासाठी हरयाणा येथून पाचजण विमानाने मुंबईत आले. तेथून ते लोकलने कल्याणला पोहोचले. त्यांनी सरफुद्दीन आणि उमेशला एटीएम फोडण्यासाठी झटपट तंत्राची माहिती दिली. बँक ऑफ इंडियाच्या एका खोलीतील दोन एटीएम फोडून सहा जणांनी 27 लाख रुपयांची रक्कम एटीएममधून चोरली. काही रक्कम उमेश व सरफुद्दीन यांना देऊन उर्वरित रक्कम घेऊन पाच चोर पुन्हा विमानाने हरियाणाला रवाना झाले.