मुंबई : ट्रेनमध्ये मोबाईल फोन हरवण्याचे किंवा चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास घडतात. पण चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल फोन परत मिळणं म्हणजे नशिबच म्हणावं लागेल. परंतु कल्याण रेल्वे पोलिसांनी प्रवाशाचा मोबाईल फोन चोरणाऱ्या अशाच एका चोरट्याचा पाठलाग करुन त्याला अटक केली. दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर काठी मारुन खाली पडलेला मोबाईल घेऊन हा चोरटा पळ काढत होता.


लोकल आणि एक्स्प्रेसच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या हातावर काठीचा फटका मारत मोबाईल चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कसारा ते इगतपुरी दरम्यान गोदावरी एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाच्या हातावर काठी मारत खाली पडलेला मोबाईल चोरुन पळणाऱ्या आरोपीला गस्तीवर असणाऱ्या कल्याण रेल्वे पोलिसांच्या पथकाने पाठलाग करत पकडले. या दरम्यान आरोपीने पाठलाग करणाऱ्या पोलिसांनाही काठीचा धाक दाखवून पळून जाण्याच्या प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी धाडसाने त्याला अटक केली. गोरख शिगवे असं या चोरट्याचं नाव असून या चोरट्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात पाच ते सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. चोरी केलेले मोबाईल फोन तो त्याचा साथीदार आकाश भल्ला याच्या मदतीने विकत असल्याचे तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी आकाश भल्ला यालाही बेड्या ठोकल्या.


26 एप्रिल रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास गोदावरी एक्स्प्रेसच्या फूटबोर्डवर बसून 19 वर्षीय सोमनाथ धोत्रे हा विद्यार्थी कसारा ते इगतपुरी प्रवास करत  होता. गाडी कसारा स्टेशनहून मार्गस्थ होताच सोमनाथ दरवाज्यात उभा राहून फोनवर बोलत होता. त्याचवेळी ट्रॅकच्या शेजारी हातात काठी घेऊन उभ्या असलेल्या गोरखने त्याच्या हातावर फटका मारला. हा फटका मोबाईल फोनवर बसल्याने विद्यार्थ्याच्या हातातून फोन खाली पडला. मग गोरखने मोबाईल फोन उचलून पळ काढला. यानंतर सोमनाथने देखील त्याच्या पाठीमागे उडी मारली. प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला त्यावेळी त्या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ या चोराचा पाठलाग सुरु केला. या दरम्यान गोरखने पोलिसांना काठीचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले. त्याची झडाझडती घेतली असता त्याच्याकडून चोरलेला मोबाईल फोन मिळाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या. 


पोलिसांच्या माहितीनुसार हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध पोलिस स्थानकात त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरलेले सात मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. तपासादरम्यान हा गोरख चोरी केलेले मोबाईल आकाश भल्ला या आपल्या साथीदाराला विकत असल्याचं समोर आलं. मग रेल्वे पोलिसांनी त्याला देखील अटक केली.