Kalyan Crime News : दारू पार्टीत एका छोट्याशा गोष्टीवरून शिविगाळ करणे हे एकाच्या जीवावर बेतले आहे. शिवी देण्यावरून सुरू झालेल्या वादात एकाने आपल्या मित्राचीच गोळ्या झाडून हत्या केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोनजण फरार आहेत. या घटनेने टिटवाळामध्ये खळबळ उडाली आहे.
सराईत गुन्हेगार असलेल्या मित्रांनी दारू पार्टीचे नियोजन केले. दारु पित असताना एकमेकांना शिव्या दिल्या. मित्रांमध्ये सुरु असलेला हा वाद इतका विकोपाला गेला की एकाने देशी कट्ट्याने गोळी मारुन राजन उर्फ जानू येरकर याची हत्या केली. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी रोहित भालेकर आणि समीर चव्हाण या दोघांना अटक केली आहे. अन्य दोन जण परवेज शेख आणि सुनिल वाघमारे यांचा पोलीस शोध घेत आहेत. चार पैकी तिघेजण सराईत गुन्हेगार आहेत.
नेमकं काय झालं?
टिटवाळा ग्रामीण भागातील म्हारळ येथील सूर्यानगर परिसरात पाच मित्र दारु पित बसले होते. रोहित भालेकर परवेज शेख, सुनिल वाघमारे, समीर चव्हाण आणि राजन येरकर यांची दारु पार्टी सुरू असताना राजन आणि एकात वाद झाला. एकमेकांना शिवी देत होते. या दरम्यान रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला असलेल्या देशी कट्टा काढून राजन येरकरवर गोळी झाडली. या गोळीबारात राजन येरकर हा घटनास्थळीच ठार झाला. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंगटे यांच्या पथक आरोपीना शोधण्याकरीता निघाले. काही वेळातच पोलिसांनी रोहित भालेकर आणि समीर चव्हाण याला अटक केली. मात्र या प्रकरणातील सुनिल आणि परवेज हे दोघे अद्याप फरार आहे. या दोघांचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेमुळे म्हारळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
युवकाची निर्घृण हत्या करणाऱ्या तिघा बापलेकांना पोलिसांनी केली अटक
चहाटपरीवरील उधारीच्या पैशातून एकाची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया शहरालगत (Gondia Crime News) असलेल्या कुडवा येथे उघडकीस आला. किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात (Gondia News) एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघा बापलेकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. शनिवार, 6 जानेवारीला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
गोंदिया शहरालगत असलेल्या कुडवा येथे या प्रकरणातील आरोपी असलेल्या संतोष मानकर यांचे चहा नाश्त्याचे दुकान आहे. तर मृतक ईश्वर उर्फ मनीष भालाधरे हा या दुकानात कायम चहा नाश्त्यासाठी येत होता. दरम्यान मृतक ईश्वरची उधारीही येथे चालत होती. गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये उधरीच्या पैश्यांवरून वाद निर्माण झाला होता. अनेकवेळा या दोघांमध्ये यांच पैशावरुन शाब्दिक चकमक देखील झाली होती. जेव्हा संतोष मानकर त्याला पैसे मागायचा तेव्हा ईश्वर उर्फ मनीष त्याला धमकी देत होता.