Kalyan Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करणाऱ्या विकृत नराधमाला कल्याण महात्मा पोलिस बेड्या ठोकल्या आहेत. 14 दिवस पोलीस या नराधमाच्या मागावर होते. सूरज शंकर सिंह उर्फ वीरेंद्र शंकर मिश्रा असे आरोपीचे नाव आहे. 10 वर्षापूर्वी याच नराधमाने एका 9 वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करत केला होता. या गुन्ह्यात तो 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा भोगून हा आरोपी 14 नोव्हेबर रोजी कारागृहाबाहेर पडला होता. यानंतर केवळ 15 दिवसात पुन्हा त्याने एका अल्पवयीन मुलीसोबत हे कृत्य केले. अशा विकृत मनोवृत्तीच्या आरोपीचा खटला जलद गती न्यायालयात चालवून त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी लवकरच दोषारोप पत्र दाखल केले जाणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  


कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील एका इमारतीच्या मागील बाजूस आठ वर्षीय मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला आणि एकच खळबळ उडाली होती. 1 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हा प्रकार उजेडात आला आणि कल्याण महात्मा पोलिसांनी तपास सुरू केला. आपल्या आई वडिलांसह भीक मागून ही मुलगी उदरनिर्वाह करत होती. या मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. मुलगी व तिचे कुटुंबीय फिरस्ती आणि आरोपी देखील फिरस्ता असल्याने हा आरोपी पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते.


पोलिसांनी संशयित अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली होती.  डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने तपास सुरू केला. खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपीचा शोध सुरु केला. ठाण्यापासून कर्जत कसारापर्यंत रेल्वे स्टेशन आणि इतर परिसर पिंजून काढल्यानंतर 14 दिवसांनी आरोपी भिवंडीतील सोनाळे परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. स्टेशन परिसरात मुलगी आई वडिलांसोबत झोपलेली असताना तिला उचलून नेले. तिच्यावर ब्लेडने वार केले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. गळा चिरल्याने तिचा मृत्यू झाला होता. तिला तिथेच टाकून तो पसार झाला होता.  कारागृहातून सुटून आल्यानंतर तो भिवंडी सोनाळे गावात राहत होता. 26 नोव्हेबर रोजी आरोपीला सोनाळे गावात नागरिकांनी बकरीसोबत अनैसर्गिक कृत्य करताना पाहिलं होतं. त्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. 


दरम्यान अल्पवयीन मुलांना हेरून त्याच्यावर पाळत ठेवत संधी साधत त्यांच्यावर लैगिक अत्याचार करणे आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या चिमुरड्याची हत्या करणे हीच त्याची गुन्ह्याची पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.