ठाणे : कल्याणमधील एका बँकेला 26 कर्जदारांनी तसेच दोन कंपन्या, कन्सल्टंट, बिल्डर्सने संगनमताने होम लोनच्या नावाखाली तब्बल सहा कोटी 30 लाख 17 हजारांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
कल्याणमधील एका नामांकित बँकेमध्ये बनावट कागदपत्रं सादर करून बँकेकडून गृह कर्ज मंजूर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल 26 कर्जदार, कर्ज मंजुरीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांचे पूर्तता करून देणारे कन्सल्टंट तसेच कर्जदार, कंपनी, बिल्डर यांनी आपापसात संगनमत करून ही फसवणूक केल्याचे उघड झालंय. याप्रकरणी बँक प्रशासनाने तक्रार नोंदवल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे आर्थिक शाखा करत आहे.
काय आहे प्रकार?
जुलै 2021 पासून हे कर्ज मंजुरीचे प्रकरण सुरू असताना मे. कोरवी ॲग्रो, मे. क्रक्स रिस्क या कंपन्यांच्या संचालकांनी 26 कर्जदारांना कर्ज मिळून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या साहाय्याने बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. खळबळजनक बाब म्हणजे बँकेतून कर्ज मंजुरीतील मध्यस्थ उमेश भाईप, मे. कोरवी ॲग्रो प्रा. कंपनीचे संचालक कोकरे, मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंटचे संचालक आणि इतर 26 कर्जदार, श्री सिध्दीविनायक डेव्हलपर्स, श्री साईराज बिल्डर, साई सृष्टी बिल्डर, संस्कृती बिल्डर्स आहेत. कोरवी ॲग्रो प्रा. लिमिटेड कंपनी स्थापन करुन संचालकांनी या कंपनीतील 26 कर्जदारांना कर्ज पाहिजे असा प्रस्ताव तयार केला.
या कर्ज मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ सल्लागार उमेश भाईप यांनी पुढाकार घेतला. 26 कर्जदारांच्या घरांच्या किंमती तत्कालीन रेडी रेकनर दरापेक्षा वाढवून त्या आधारे कर्जदारांच्या जुन्या सदनिकांचे पुनर्विक्रीचे बनावट विक्रीपत्र आरोपी यादीतील मे. सिध्दीविनायक डेव्हलपर्स, साईराज बिल्डर्स, साई सृष्टी बिल्डर्स, संस्कृती बिल्डर्स यांनी तयार करुन दिली. कर्जदारांना कर्ज मंजूर करताना कागदपत्र आणि त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी संबधित बँकेने मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या तिऱ्हाईत कंपनीची नियुक्ती केली.
क्रिक्स कंपनीने कर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन वास्तवदर्शी अहवाल बँकेला देणे आवश्यक होते. परंतु, बँकेची फसवणूक करायची या एका उद्देशाने एकत्र आलेल्या मे. कोरवी, मे. क्रक्स, विकासक आणि 26 कर्जदारांनी संगनमत करुन कर्जासाठीची बनावट कागदपत्र तयार करुन ती खरी आहेत असे बँकेला भासवून बँकेकडून सहा कोटी 30 लाख 17 हजार रुपयांचं कर्ज मंजूर करुन घेतले. बँकेची हप्तेफेड सुरू होताच कर्जदारांना हप्ते भरण्यास टाळाटाळ सुरू केली. बँकेने या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्जदारांनी बनावट कागदपत्र दाखल करुन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन हे प्रकरण अधिकच्या तपासासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.