कल्याण : बोगस कागदपत्राच्या आधारे बोगस जामीनदारांच्या मदतीने जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका वकिलासह तीन बोगस जामीनदार आणि आरोपीच्या वडिलांना कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांनी कल्याण न्यायालयाच्या परिसरातून अटक केली आहे. न्यायालयाने या सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून बोगस कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणारे एक मोठ रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त करत पुढील तपास सुरू केला आहे .
कल्याण क्राईम ब्रांचला काही इसम गंभीर गुन्ह्यातील अटक आरोपींना कोर्टात बनावट कागदपत्रे तयार करून बोगस जामीनदार देत जामीन करून देत असल्याची माहिती मिळाली होती. क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर शिरसाठ यांनी पोलीस अधिकारी भूषण दायमा, मोहन कळमकर, विनोद चन्ने, मोहन खंडारे, पोलीस अधिकारी फालक, मिथून राठोड आणि अन्य पोलिसांचे एक पथक तयार केले. त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या मागे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत या पथकाने तपास सुरू केला होता.
याच दरम्यान एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बोगस जामीनदार कोर्टासमोर हजर केले जाणार असून यासाठी बोगस कागदपत्रं तयार करण्यात आल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला मिळाली होती. संबंधित इसम कल्याण न्यायालय परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच क्राईम ब्रांचच्या पथकाने सोमवारी कल्याण न्यायालय परिसररात सापळा रचत वकील रफीक शेख, आरोपीचे वडील मोहम्मद हमीद, हबीब हाश्मी, बोगस जामीनदार संतोष मोर्या, जयपाल जोगीरी यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता चंद्रकांत खामकर हा इसम हे कागदपत्र बनवून देत असल्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी खामकरला वसई येथून अटक केली.
सुरुवातीला बोगस जामीनदारांचे वकील रफीक शेख यांनी सर्व कागदपत्रे व्यवस्थीत असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांना जामीनदारांवर संशय आल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता पोलिसांचा संशय खरा ठरला. बोगस कागदपत्रंच्या आधारे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याकडून अटक करण्यात आलेल्या एका खुनाच्या आरोपीला बोगस जामीनदार तयार करण्यात आले होते. आज या सर्व आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या सगळ्या आरोपीना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवत त्या दृष्टीने पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :
- कल्याण महात्मा फुले पोलिसांची कारवाई; आठवडाभरात 24 गुन्ह्यांची उकल ,दोन महिलांसह सहा चोरट्यांना अटक
- घरातील गुप्त लॉकरमधून 30 लाखांचे दागिने चोरणाऱ्या पिता-पुत्राला अटक
- "शीना बोरा जिवंत आहे"; मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र