कल्याण : सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात घरे देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या आणि 7 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात कल्याण क्राइम ब्रांचला यश आलंय. स्थानिक महात्मा फुले चौक पोलिसांचे पथक या आरोपीच्या शोधात होते. तर न्यायालयाने मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊनही हा आरोपी पोलिस ठाण्यात किंवा न्यायालयात हजर होत नव्हता. मात्र, क्राईम ब्राँचच्या कल्याण युनिटने या आरोपीला गजाआड केले आहे.


माजीदअली उर्फ गुड्डू मन्सुरअली शेख (वय 41) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडे कामराजनगरातील हिंदुस्थान चाळीत राहणारा आहे. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात 2014 साली फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तरीही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर न्यायालयाने त्याची उत्तरप्रदेशातल्या लखनौ येथील 1.75 कोटी रुपयांची प्रॉपर्टी जप्त करून लिलावाचे आदेश दिले. त्यानंतर हा आरोपी नवी मुंबईतील कामोठे परिसरातल्या तिरूपती अपार्टमेंटमध्ये लपला असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचला मिळाली. 


क्राइम ब्रांचच्या पथकाने इमारतीत घुसून फ्लॅटमध्ये लपून बसलेल्या माजीदअली शेख याला अटक केली. माजीदअली उर्फ गुड्डू याला महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयाने एकाला 3 वर्षे, दुसऱ्याला 6 वर्षे कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तर माजीदअली उर्फ गुड्डू याच्या विरोधात 2016 सालात उत्तरप्रदेशातल्या गोंडा जिल्ह्यातील खोडारे पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती क्राईम ब्राँचच्या हाती लागली आहे. 


काय होते प्रकरण?
2014 साली डोंबिवलीजवळील नेवाळी येथील आरक्षित जमिनीवर अनधिकृत चाळी बांधून स्वस्तात घरांचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची सुमारे दीड कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी माजीदअली उर्फ गुड्डू मन्सूरअली शेख यासह सहा जणांवर कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या प्रकारणातील सहा जणांपैकी एकाला न्यायालयाने 3 वर्ष तर दुसऱ्या आरोपीला 5 वर्ष शिक्षा सुनावली होती. मात्र, माजीदअली उर्फ गुड्डू मन्सूरअली शेख हा फरार झाला होता. सात वर्षे तो पोलिसाना गुंगारा देत होता. मात्र, नवी मुंबई येथे लपून बसलेल्या गुड्डूला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय.