वसई : जिल्हा परिषदेमध्ये शिकवणार्‍या एका शिक्षकाला आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी एका पत्राद्वारे मिळाली असून त्यासोबतच दोन बंदुकीच्या गोळ्यासुद्धा पाठवण्यात आल्या होत्या. 14 ऑगस्ट रोजी संतोष पांडुरंग साबळे (वय 38) हे केतकीपाडा दहिसर येथे राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांना भेटायला गेले होते, त्यांच्या दरवाजाबाहेर एक लाकडी बॉक्स ठेवला गेला होता. जो संतोष साबळे यांच्या नजरेस पडला. त्या लाकडी बॉक्समध्ये एक पत्र होतं ज्यावर संतोष साबळेचं नाव लिहिलं होतं.


संतोष साबळे हे गेल्या दहा वर्षापासून वसई परिसरात राहतात आणि ते अधूनमधून त्यांच्या आई-वडिलांना भेटायला दहिसरमध्ये येत असतात. संतोष साबळे यांनी जेव्हा ते पत्र उघडलं तेव्हा त्याच्यात हिंदीमध्ये त्याच्यासाठी एक निरोप लिहिला होता, त्यात लिहिलं होतं की "मौत का पैगाम तुम्हारे और फॅमिली के नाम" इतकच नाही तर त्या पत्रासोबत दोन बंदुकीच्या गोळ्यासुद्धा ठेवण्यात आल्या होत्या, हे पत्र वाचताच संतोष साबळे यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याने लगेच स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली.


संतोष साबळे पालघर जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक आहेत तसेच महाराष्ट्र वारकरी महामंडळ या संस्थेचे ते सभासदसुद्धा आहेत. साबळे समाज कार्यात सुद्धा तितकेच पुढे असतात. दहिसर परिसरात चालत असलेल्या गैरेकामांबद्दल साबळे यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. 2015 मध्ये साबळे यांच्यावर नालासोपारा पोलीस स्टेशन येथे पॉक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला होता. मात्र, आपण समाजकार्य करतो आणि हे काम थांबवण्यासाठी सूडबुद्धीने आणि कट रचून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं साबळे यांनी सांगितलं. हे पत्र आणि बंदुकीच्या गोळ्या कोणी पाठवल्या आहेत याबद्दल साबळे यांना काहीच कल्पना नाही. मात्र, त्यांच्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी त्यांच्या तक्रारीत लिहली आहे.


साबळे यांना जे धमकीच पत्र पाठवण्यात आला आहे ते पत्र इंग्रजीमध्ये लिहिलं असून एका लाकडी बॉक्समध्ये त्यांच्या घराच्या दरवाजा बाहेर ठेवण्यात आलं होतं. हे पत्र पोस्टाने पाठवलं गेलं नाही. मात्र, यामागे नेमका कोण आहे आणि त्यांनी हे कृत्य का केलं? याचा तपास पोलिस आणि गुन्हे शाखा या दोन्ही समांतर करत आहेत. आयपीसी 506 (2) आणि 507 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.