Crime News: संपूर्ण देशाला हादरवून सोडलेलं श्रद्धा वालकर खून प्रकरण आठवतंय का? आफताबने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचे निर्दयीपणे तुकडे केले आणि तिला जंगलात फेकून दिले. दिल्लीतील या घटनेने संपूर्ण देश हादरला. आता झारखंडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने श्रद्धा वालकरप्रमाणेच आपल्या प्रेयसीचे तुकडे केले. तुकडे केल्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुकडे जंगलात फेकून दिले. जेणेकरून ते तुकडे वन्यप्राणी खातील. पण 24 नोव्हेंबर रोजी जरियागड पोलीस स्टेशन हद्दीतील जोरदग गावातील लोकांनी अशी घटना पाहिली की त्यांना धक्काच बसला.
एक श्वान माणसाचा हात तोंडात धरून फिरत होता. गावातील लोकांनी यांची माहिती पोलिसांना दिली. नरेश भेंगरा असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. तो 25 वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात पहिलं प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप, नंतर दुसरे लग्न, बलात्कार आणि नंतर खून असं सगळं नाट्यमय प्रकारचं घडलं आहे.
आरोपी मांस कापण्याचं काम करायचा
गांगी कुमारी असे या प्रयसीचे नाव आहे. वास्तविक गांगी आणि नरेश लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नरेश मांस कापण्याचे काम करायचा. दोघेही खुंटी येथील रहिवासी होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघेही तामिळनाडूला गेले आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. दोघांचेही सर्व काही ठीक चाललं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी नरेश पुन्हा झारखंडला आला आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. गांगीला याबाबत काहीच माहिती नव्हती. आश्चर्याची बाब म्हणजे लग्नानंतर नरेश परत गेला आणि गांगीसोबत राहू लागला.
जंगलात अत्याचार अन् नंतर तुकडे
खुंटीचे एसपी अमन कुमार यांनी सांगितले की, दोघे (नरेश आणि गांगी) 8 नोव्हेंबरला खुंटीला पोहोचले. गांगीला नरेशच्या घरी जायचे होतं. त्याच्यासोबत राहायचं होतं. पण तो तयार नव्हता. त्याने घरी नेण्याऐवजी गांगीला जंगलात नेलं. तिथे त्याने तिला थांबायला सांगितले आणि तो स्वतः कुठेतरी गेला. तो परत आला तेव्हा त्याच्याकडे धारदार शस्त्र होतं. आधी त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर स्कार्फने तिचा गळा आवळून खून केला. निर्दयीपणे तो गांगीचे तुकडे करू लागला. पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने गांगीचे 40 ते 50 तुकडे केले.
प्रकरण कसं आलं समोर?
हत्येनंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर, 24 नोव्हेंबर रोजी एक श्वान मानवी प्रेताचा तुकडा घेऊन जाताना दिसला. कुत्र्याच्या तोंडात मानवी हात असल्याचे पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक जंगलात पोहोचले तेव्हा मृतदेहाचे अनेक तुकडे आढळून आले. एक बॅगही सापडली, ज्यामध्ये गांगीचे आधार कार्ड आणि काही वस्तू आढळून आल्या होत्या. नरेश हा व्यावसायाने मांस कापणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशी सुरू आहे.