Jharkhand Murder Case : झारखंडमध्ये (Jharkhand) 'श्रद्धा हत्याकांड' (Shraddha Murder Case) सारखं प्रकरण समोर आलं आहे. प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहाचे 50 तुकडे करून फेकल्याची (Body Chopped into 50 Pieces) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, झारखंडमधील एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे लोखंड कापण्याच्या कटरने तुकडे केले आणि या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ते पोत्यामध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. सुत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेहाचे सात ते आठ तुकडे सापडल्याचा दावा केला आहे.
झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील बोरिया पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये दिल्लीतील 'श्रद्धा वालकर हत्याकांड' सारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. पोलिसांकडून श्वान पथकाच्या साहाय्याने मृतदेहाचे अवशेष शोधण्याचं काम सुरु आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी दिलदारसह सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर् आरोपींची चौकशी सुरु आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत आहे.
लोखंड कापण्याच्या कटरने केले मृतदेहाचे तुकडे
मृत तरुणीचं नाव रूबिका पहाडीन असल्याची माहिती समोर येत आहे. प्रियकर दिलदार अंसारीने रुबिकाची हत्या करत तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. रुबिनाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आरोपी दिलदारने लोखंड कापण्याच्या कटरने मृतदेहाचे तुकडे केले. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, दिलदार आधीच विवाहित असल्याचं म्हटलं जात आहे. रुबिका दिलदारची दुसरी पत्नी असल्याची चर्चा आहे. रूबिका आणि दिलदार पती-पत्नी असल्याचं म्हटलं जात आहे पण, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरु असून त्यातून अधिक माहिती समोर येईल. दरम्यान, दिलदारने नातेवाईकांसोबत मिळून रुबिकाची हत्या केली, सुत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे. याबाबत पोलीस तपासात अधिकृत माहिती समोर येईल.
पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु
झारखंडमधील बोरीओ भागात येथील बांधकाम सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्रामागे शनिवारी सायंकाळी एक पाय आणि मानवी शरीराचे दोन तुकडे आढळून आले. या परिसरात एकच खळबळ उडाली होती. कुत्रे मृतदेहाच्या तुकड्यांचं लचके तोडत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. बोरीओ पोलीस ठाण्याचे प्रभारी जगन्नाथ पान, एएसआय करुण कुमार राय यांनी बोरीओ येथे घटनास्थळी जाऊन तपास केला.
दिलदारसह सात आरोपी अटकेत, दोन शस्त्र जप्त
तपासात पोलिसांना अंगणवाडी केंद्रापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर असलेल्या एका जुन्या बंद घरातून मानवी मृतदेहाचे अनेक अवशेष गोणीमध्ये भरलेल्या स्थितीत सापडले. आरोपी दिलदारने मृतदेहाची ओळख पटवली. पोलीस अधीक्षक अनुरंजन किस्पोटा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र दुबे शनिवारी रात्री उशिरा बोरिओ पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस अधीक्षक अनुरंजन किस्पोटा यांच्या नेतृत्वाखाली आरोपी दिलदार सोबत त्याच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांकडून दोन धारदार शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत.