Jalna News : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील आदरखेडा गावात जन्मदात्या आईनेच पोटच्या 5 वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन स्वत: देखील घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. गंगासागर उगले असे मयत महिलेचे नाव असून तिने 5 वर्षीय बाळाला फाशी देत स्वतः देखील आत्महत्या केली. मयत महिला मानसिक आजाराने ग्रस्त होती तिच्यावर वैद्यकीय उपचार देखील सुरू होते अशी माहिती पोलिसांनी दिलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


जन्मदात्या आईनेच पोटच्या 5 वर्षीच्या मुलाला झोपेत गळफास देऊन स्वत: घरातच पत्राच्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील आरदखेडा गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. जाफ्राबाद पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जाफ्राबाद ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी  गजानन उगले यांच्या फिर्यादीवरून जाफ्राबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सखाहारी तायडे अधिक तपास करत आहेत.    


आरदखेडा येथील दिलीप उगले यांचा मुलगा महादू उगले यांचा विवाह वर्ष 2013 मध्ये भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथील महादू कुदर यांची कन्या गंगासागर यांच्याशी झाला होता. महादु उगले छत्रपती संभाजीनगर येथे एका कंपनीमध्ये नोकरीला असल्याने दोघे पती-पत्नी संभाजीनगरला राहत होते. संसार सुरळीतपणे सुरू असतानाच गंगासागर उगले यांना मानसिक आजार जडल्याने तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृतीमध्ये कुठलीच सुधारणा होत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी पती महादू उगले यांनी मुलगा अंश व पत्नी गंगासागर यांना आदरखेडा येथे आईवडिलांकडे आणून सोडले होते. गावाकडे असताना गंगासार हिच्यावर खासगांव, विदर्भातील सैलानी येथे उपचार करण्यात आले. परंतु याचा कुठलाच उपयोग झाला नाही. दरम्यान गंगासागर उगले, मुलगा अंश तसेच सासू-सासरे घराबाहेर अंगणात झोपलेले होते. तेव्हा गंगासार हिने घरातील पत्राच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने मुलगा अंशला गळफास दिला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली आहे.