Pune Ganeshptsav 2022: पुण्यात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी 2 दिवस दारु विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता रहावी यासाठी हे आदेश काढण्यात आले आहे.
कोणत्या दिवशी असेल विक्री बंद
यंदा पुणेकर दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा करणार आहे. त्यासाठी शहरात जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. पुणे पोलीस देखील या गणेशोत्सवासाठी सज्ज झाले आहे. या गणेशोत्सवाला गालबोट लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दोन दिवशी पुणे जिल्ह्यात दारु विक्री बंद ठेवण्यात आली आहे. तर पाचव्या आणि सातव्या दिवशी ज्या परिसरात विसर्जन केलं जातं त्या परिसरात दारु विक्रीला बंदी असेल शिवाय अनंत चतुर्थीच्या दिवशीच्या मिरवणुकासंपेपर्यंत त्या मार्गावरील सगळे दारु विक्रीकेंद्र बंद असणार आहे.
तातडीने कारवाई होणार
पाच दिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहरात दारु विक्रीला बंदी करण्यात आली आहे. सगळ्या दारु विक्रेत्यांना या संगर्भातच्या सुचना देण्यात आल्या आहे. या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे.
गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज
गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज आहेत. त्यांनी यासाठी नियमावली देखील जाहीर केली आहे. पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील माहिती दिली. शहरात 3,600 सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. या मंडळांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर देखील या गणपती मंडळांच्या गर्दीच्या ठिकाणी असणार आहे. शहरात 7,500 पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आला आहे. गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या कारवाईत तीन हजाराहून अधिक सराईत गुंडांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत 42 जणांना अटक करण्याल आली आहे. कोयते, तलवारी, गावठी दारु पुणे पोलिसांनी जप्त केली आहे.
वाहतूक कशी असेल?
वाहतुकीसाठी काही रोड बंद केले जातील. या बाबतीत सविस्तर नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. पी एम पी एल बसेस साठी देखील पर्यायी मार्ग दिलेले आहेत. अथर्व पठण साठी येणाऱ्या महिलांना वाहतुकीची अडचण होणार नाही याची दखल घेण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितलं आहे.