जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावाचे सरपंच आणि लिपिक शांताराम बोरसे यांना दहा लाखांच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. एका प्लॉट खरेदी प्रकरणात त्यांनी ही मागणी केली होती. त्यापैकी दोन लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. सरपंच राजेंद्र मोरे, लिपिक शांताराम बोरसे आणि त्यांचा सहकारी सुरेश ठेंगे या तिघांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील बहाळ रथाचे या गावाचे सरपंच असलेल्या राजेंद्र मोरे आणि लिपिक शांताराम बोरसे यांनी एका तक्रारदाराकडे पंधराशे चौरस फूट प्लॉट खरेदी करून देण्यासाठी तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंतिम पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर त्यापैकी दोन लाख रुपये घेण्यासाठी सरपंच आणि लिपिक यांनी त्यांचा सहकारी सुरेश ठेंगे याला पाठवले. हे पैसे स्वीकारताना त्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने रंगेहात अटक केली. याप्रकरणी सरपंच राजेंद्र मोरे आणि लिपिक शांताराम बोरसे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
काय म्हटलंय लाचलुचपत विभागाच्या निवेदनात?
लोकसेवक राजेंद्र महादु मोरे, सरपंच, शांताराम तुकाराम बोरसे, लिपीक, ग्रामपंचायत, बहाळ रथाचे, ता. चाळीसगांव जि. जळगांव यांनी तक्रारदार यांचेकडे १५०० चौ. फु. चा प्लॉट खरेदी करुन देण्याच्या स्वरुपात लाचेची मागणी केल्याने त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने १०,००,००० /- रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती ५,००,०००/- रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन त्यापैकी २,००,००० /- रुपये लाचेची रक्कम खाजगी इसम सुरेश सोनू ठेंगे यांचे हस्ते स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारदार हे मौजे बहाळ रथाचे, ता. चाळीसगांव जि. जळगांव येथील रहिवासी असून त्यांची मौजे बहाळ रथाचे येथे त्यांचे मालकी कब्जे वहीवाटीतील शेतजमीन असुन सदर शेतजमीनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी दिवाणी न्यायालयाकडून ग्रामपंचायत बहाळ यांचेविरुद्ध कायम स्वरुपी मनाई हुकुम आणला होता.
त्यानंतर सरपंच राजेंद्र महादु मोरे यांनी तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमीनी बाबत कोर्ट कचेऱ्यांचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर सदर शेतजमीनूतुन दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट त्यांना खरेदी करुन दयावा लागेल असे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी प्लॉट स्वरुपात ते काहीएक देवू शकणार नसल्याचे सांगितल्याने सरपंच राजेंद्र मोरे यांनी १०,००,००० /- रुपये द्यावे लागतील अन्यथा ग्रामपंचायतीकडून तुला कोर्ट कचेऱ्यांचा त्रास सहन करावा लागेल असे सांगितले.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक धुळे कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांचेकडे दीड हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी करुन देण्याच्या स्वरुपात लाचेची मागणी केली असता त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी १०,००,००० /- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ५,००,०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते.
सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी तक्रारदार यांना भेटून लाचेची रक्कम बहाळ येथे तक्रारदार यांच्या राहते घरी खाजगी इसम सुरेश ठेंगे यांचेकडेस देण्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे आज तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता सरपंच राजेंद्र मोरे व लिपीक शांताराम बोरसे यांनी सांगितल्या प्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता २,००,०००/- रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना खाजगी इसम सुरेश ठेंगे यांना रंगेहात पकडण्यात आले असून राजेंद्र महादु मोरे, सरपंच, शांताराम तुकाराम बोरसे, लिपीक, ग्रामपंचायत, बहाळ रथाचे, ता. चाळीसगांव जि. जळगांव व खाजगी इसम सुरेश सोनु ठेंगे यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.