Pune IPL Batting : सध्या देशात सगळीकडे आयपीएलचं फिव्हर आहे. त्यातच पुण्यात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या 3 सट्टेबाजांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध पबच्या मालकासह बड्या बुकीचा समावेश आहे. एवढंच नाही तर आयपीएल सामन्यांवरील सट्टेबाजीचे धागेदोरे मुंबई, नागपूरसह थेट दुबईपर्यंत झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वसीम हनीफ शेख, इक्रमा मकसुद मुल्ला, मुसाबित मेहमुद बाशाइब यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
आयपीएल (इंडीयन प्रीमियर लीग) म्हणजेच अनेकांच्या प्रतिभेला संधी मिळवून देणारी क्रिकेट स्पर्धा. याच आयपीएलमुळे कित्येक उभरत्या खेळाडूंना जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची, त्यांच्याकडून खेळातील बारकावे शिकण्याची संधी मिळाली. तर, दुसरीकडे, सट्टेबाजांच्या तावडीतून आयपीएलदेखील सुटले नाही. अनेक ठिकाणी आयपीएलच्या सामन्यावर बेटिंग घेतले जात असे. बेटिंग घेणाऱ्यांवर पुण्यातील खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी कोंढवा भागातील एका इमारतीत सुरू असलेला सट्टेबाजांचा अड्डा उधळून लावला. यावेळी तिघांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध पब मालक जितेश मेहता याला देखील अटक केली आहे.
'मोबाईल, डायरी आणि लॅपटॉप जप्त'
या सट्ट्यातील मुख्य बुकी अक्षय तिवारी हा मध्यप्रदेशात वास्तव्यास आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. आरोपी जितेश मेहता हा पबमालक आहे. इंदूरमधील सट्टेबाज अक्षय तिवारी याच्याशी मेहताचे लागेबांधे आहेत, हे तपासातून समोर आलं आहे. आरोपींनी सट्टेबाजांसाठी तीन इमेल आयडीचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. इंदूरमधील सट्टेबाज तिवारी याचे बँक खाते गोठविण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. इतकंच नाही तर या बेटिंगचे कनेक्शन थेट टर्की, दुबई सारख्या देशात गेल्याच समोर आलं आहे. आतापर्यंत या आरोपींकडून मोबाईल, डायरी आणि लॅपटॉप हस्तगत करण्यात आलेलं आहे.
पैसे कमावण्याच्या मोहाला बळी पडू नका; पोलिसांंचं आवाहन
क्रिकेटचा जागतिक महोत्सव म्हणून आयपीएलकडे पाहिलं जातं. मात्र याच खेळामागे बेटिंग सारखं रॅकेट तरुणांना जेलची हवा खायला भाग पाडत आहे. यामुळे कुठल्याही पैसे कमावण्याच्या मोहाला बळी पडू नका. क्रिकेट हा खेळ आहे खेळाडू म्हणून त्यातून भरपूर शिका आणि प्रेक्षक म्हणून खेळाचा पुरेपूर आनंद लुटा, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.