नागपूर : नागपुरात टवाळखोर गावगुंडांची दादागिरी कशी निर्दोष नागरिकांचे बळी घेत आहे, याचा एका अत्यंत दुर्दैवी प्रसंग कोदर्लीकर कुटुंबासोबत घडला आहे. गावगुंडांनी रस्त्यावर हल्ला करत पाठलाग केला म्हणून जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर पळणाऱ्या निर्दोष तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्याच्या मृत्यूची बातमी घरी कळताच वृद्ध आजोबांचा धसक्याने मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे गुरुपाल हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रसंगामागे टवाळखोर तरुणांनी करून घेतलेला एक गैरसमज कारणीभूत होता. आता हे सर्व टवाळखोर फरार झाले असून कोदर्लीकर कुटुंब न्यायाची मागणी करत आहे.


प्रकाश कोदर्लीकरचे वय 21 वर्षाचा होते. कोवळ्या वयात ही दुकानात काम करून आपल्या गरीब आई वडिलांचा आधार बनलेला प्रकाश रविवारी रात्री त्याच्या काही मित्रांसह कामठी रोडवरील गुरुपाल हॉटेल मध्ये जेवायला गेला होता. पाचही मित्र आपापसात थट्टा मस्करी करत जेवत होते. मात्र, त्याच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या टवाळखोर तरुणांच्या एका समूहाने प्रकाश आणि त्याचे मित्र त्यांच्यावर हसत आहेत असा गैरसमज करून त्यांच्याशी वाद घालू लागले. वाद वाढू नये म्हणून प्रकाश आणि त्याच्या मित्रांनी टवाळखोर तरुणाच्या समूहाशी माफी मागत गैरसमज करू नका अशी विनंती केली. मात्र गुंड वृत्तीच्या तरुणांचे समाधान झाले नाही. त्यांनी हॉटेल बाहेर आपल्या काही गुंड सहकाऱ्यांना बोलावून घेतले. रात्री साडे दहा वाजता प्रकाश आणि त्याचे सहकारी हॉटेल बाहेर पडताच 15 तरुणाच्या समूहाने त्यांच्या वर हल्ला केला. प्रकाश आणि त्याचे इतर चार मित्र जिवाच्या आकांताने पळू लागले. प्रकाश ही हॉटेलच्या समोरच्या मुख्य रस्त्यावर उलट्या दिशेने पळाला आणि दुभाजकाच्या पलीकडून आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यात प्रकाश याचा जागीच मृत्यू झाला..


प्रकाशच्या मित्रांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. प्रकाशला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. इकडे पहाटे प्रकाशच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी पोहोचली. प्रकाशच्या वृद्ध आजोबा जागोजी कोदर्लीकर यांनी नातवाच्या मृत्यूचा धसका घेतला. काही तासांनी त्यांचा ही मृत्यू झाला. आता कोदर्लीकर कुटुंब न्यायाची मागणी करत आहे. हॉटेलमध्ये आणि नंतर हॉटेल बाहेर प्रकाश आणि त्याच्या मित्रांसोबत वाद घालून हल्ला करणारे ते टवाळखोर तरुण कोण होते त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी प्रकाशच्या आईने केली आहे.


या प्रकरणी एबीपी माझाने घटना घडली त्या गुरुपाल हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली. घटनेच्या दिवशी प्रकाश आणि त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवायला आल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली. मात्र सीसीटीव्ही दाखवण्यास तो तयार झाला नाही. दरम्यान जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये पोलीसांनी या घटनेसंदर्भात अपघाताची नोंद केली आहे. मात्र, हॉटेलमध्ये वाद घालून आणि नंतर रस्त्यावर पाठलाग करून प्रकाशच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले ते गुंड वृत्तीचे 15 तरुण कोण होते याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात ही केलेली नाही. या विषयावर कोणतेही पोलीस अधिकारी बोलायला तयार नाहीत.


संबंधित बातम्या :