नाशिक : नायलॉन मांजामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली असून नायलॉन मांजावरील बंदी ही फक्त कागदावरच मर्यादित असल्याचं यातून समोर आलय. हा नायलॉन मांजा अजून किती जणांचे जीव घेणार? या महिलेच्या मृत्यूला जबाबदार नायलॉन मांजा की प्रशासनाचा हलगर्जीपणा? असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय.
नाशिकच्या जाधव कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. 5 वर्षाच्या प्रथमेशची आई त्याला सोडून गेलीय तर आजारपणामुळे अंथरूणाला खिळलेल्या एका वयस्कर आईचा आधार हरपलाय आणि या सर्व गोष्टीला कारणीभूत ठरलाय तो म्हणजे नायलॉन मांजा. शहरातील अमृतधाम परिसरात भारती जाधव या महिला आपल्या आई आणि मुलासह वास्तव्यास होत्या, अंबड परिसरातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आपल्या कुटुंबाचा त्या उदरनिर्वाह करायच्या. सोमवारी नेहमीप्रमाणे सकाळी त्या कामावर तर गेल्या मात्र त्यानंतर जे काही घडलं ते भयानक होत. संध्याकाळी काम आवरून त्या दुचाकीवरून घरी परतत असतानाच द्वारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस समोर पुलावर अचानक नायलॉन मांजामुळे त्याचा गळा कापला गेला आणि त्या खाली कोसळल्या.
हा मांजा अजून किती जणांचे जीव घेणार?
रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल तर करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक, मित्र मंडळी आणि कंपनीतल्या सहकाऱ्यांना धक्काच बसला. नायलॉन मांजामुळे हसरी आणि मनमिळावू स्वभावाची मैत्रीण अचानक हे जग सोडून गेल्याने प्रशासन करतय तरी काय? हा मांजा अजून किती जणांचे जीव घेणार? असा संतप्त सवाल भारती यांची मैत्रीण सिमरन शेख उपस्थित करतेय.
नागरिकांनी देखील गांभीर्याने विचार करणं गरजेचं
नायलॉन मांजाचा वापर करत दुसऱ्याची पतंग तर कापली जाते. मात्र, हा क्षणिक आनंद लूटत असतानाच याच मांजामुळे एखाद्याला आपला जीव गमवावा लागणार असेल तर या गोष्टीचा नागरिकांनी देखील गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. भारती यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेनंतर भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासोबतच नायलॉन मांजाविक्रेत्याविरोधात आता मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी म्हंटलय.
खरं तर महाराष्ट्रात नायलॉन मांजा उत्पादन करण्यासोबतच त्याची विक्री आणि वापरावर अनेक वर्षांपासून बंदी आहे. मात्र, तरी देखिल सर्रासपणे त्याचा वापर होत असल्याचं दिसून येतय. दरवर्षी संक्रांतीचा सण जवळ येऊ लागला की नायलॉन मांजामुळे एकतर माणसं जखमी होतात नाहीतर पशू पक्षांना तरी ईजा झाल्याच्या घटना समोर येतात आणि मग कुठेतरी पोलिसांकडून तात्पुरतं कारवाईच सोंग आणलं जात. मात्र, पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे बघायला मिळते. भारती जाधव यांच्या मृत्यूला नक्की जबाबदार नायलॉन मांजा की प्रशासनाचे दुर्लक्ष? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
पुणे : नायलॉनच्या मांज्याचा तातडीने बंदोबस्त करा, सुवर्णा मुझुमदार यांच्या कुटुंबियांची मागणी