जालना : जालन्यात लाचखोरीत अडकलेल्या डीवायएसपी आणि एका पोलीस निरीक्षकाकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण झालीय. या मारहानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वी अट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 2 लाखांची लाच घेणारे निलंबित डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना मारहाण करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 


औरंगाबाद रेंजचे आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. जालन्याचे अॅडिशनल एसपी या प्रकरणाची चौकशी करणार आहे. चौकशीअंती दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलंय.


9 एप्रिल रोजी जालन्यात एका अपघातग्रस्त युवकाचा शहरातील दीपक रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याच युवकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत काही युवकांनी दवाखण्यात काचा फोडून धुडगूस घातल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात 3 ते 4 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या दिवशी पोलिसांनी दीपक हॉस्पिटलमधील आयसीयूची शिवराज नारियलवाले यांनी तोडफोड केली म्हणून मारहाण केली असल्याचा खुलासा कदीम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केलाय.


पोलिसांच्या दाव्यानुसार रुग्णालयात तोडफोड केल्याने मारहाण केल्याचे सांगितले असले तरी या प्रकरणी अद्याप कोणाला आजवर अटक का झाली नाही हा प्रश्नच अनुत्तरित आहे, पीडित कार्यकर्त्याने पोलिसांनी आपल्याला घटनेच्या दिवशी रात्रभर ठेऊन दुसऱ्या दिवशी दुपारी सोडून दिल्याचं म्हटलंय. मग पोलीसांनी दीड महिन्यापूर्वी गुन्हा दाखल केलेले ते 3-4 अज्ञात आरोपी आजवर मोकाट सोडलेच कसे हे कोडच आहे.


पीडित भाजप जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांनी आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्यामुळे मारल्याचे म्हटलंय. संबंधित तोडफोडीचा आपला काहीही संबंध नसून आपण रुग्णालयाच्या आवारात  पोलीस माझ्या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीला शिवीगाळ करत असतानाचे पाहिले होते. तीच पोलिसांची शिवीगाळ मोबाईलमध्ये रेकॉर्डिग केल्यामुळे पोलिसांनी मारहाण केल्याचं म्हटलंय.


पोलिसांच्या या निर्दयी मारहाणीचा सर्वत्र निषेध होतोय. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलिसांच्या मारहानीची निंदा केलीय. या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं वागणं एका अतिरेक्यासोबतच्या वागण्यासारखे असून मारहाण करणाऱ्या अधिकारी आणि पोलिसांचे तात्काळ निलंबन करावे अन्यथा अधिवेशनात हा मुद्दा लावून धरू असे देखील त्यांनी म्हटलंय.


आज या घटनेला दीड महिना उलटून गेलाय. पीडित व्यक्तीचे FIR मध्ये नाव नाही. मग पोलीस सांगत असलेले मारहाणीचे कारण किती सत्य आहे हा प्रश्नच आहे. घटनेला दीड महिना उलटल्यानंतर हा व्हिडिओ वायरल कसा झाला हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मात्र, त्याहून गंभीर म्हणजे बाब म्हणजे एखाद्या व्यक्तीला एवढ्या पोलिसांनी अशा पद्धतीने केलेली मारहाण खाकीची इभ्रत मातीत घालत आहे.