ICICI Bank Loan Scam: व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत (Venugopal Dhut) यांना सीबीआयने अटक (CBI Arrest) केली आहे. कोचर दामप्त्याला अटक झाल्यानंतर सीबीआयने ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. चंदा कोचर (Chanda Kochar) आणि दिपक कोचर (Deepak Kochar) पाठोपाठ सीबीआयकडून आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा (ICICI Bank Loan Scam) प्रकरणातील तिसरी अटक करण्यात आली आहे. 


आर्थिक नियमितता आणि कर्ज प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यानंतर वेणूगोपाल धूत यांना अटक करण्यात आली. सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली. धूत यांना थोड्याच वेळात विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सीबीआय कोठडीत असलेले चंदा कोचर आणि दीपक कोचर यांचा रिमांड आज संपणार आहे. त्यांनाही सीबीआय आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात तिन्ही आरोपींना एकत्रपणे हजर करण्यात येण्याची शक्यता आहे. 


आज कोर्टात होणाऱ्या सुनावणीत सीबीआयकडून चंदा कोचर आणि दिपक कोचर यांची सीबीआय कोठडी वाढवण्याची मागणी सीबीआयकडून विशेष कोर्टात होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, वेणूगोपाल धूत यांचीही कोठडी मागण्यात येणार आहे. या तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे, असा मुद्दा सीबीआयकडून कोर्टासमोर मांडण्यात येण्याची शक्यता आहे. 


प्रकरण काय?


 2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेने व्हीडिओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचे कर्ज दिले होते. मात्र या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. याबाबत प्रारंभी बँकेने कोचर यांची बाजू घेतली होती. मात्र सीबीआयने तपास सुरू केल्यावर बँकेने भूमिका बदलली आणि जून 2018 मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. 


या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचं सीईओपद सोडावं लागले होते. बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे, असे सांगण्यात येते. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हीडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयनं 22 जानेवारी 2019 रोजी गुन्हा नोंदविला होता. 


इतर महत्त्वाची बातमी