बीड: पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed Maharashtra) जिल्ह्यात घडली. याप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आष्टीतील (Aashti) अंभोरा पोलिसांनी (Ambhora Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी पती गेला होता. मात्र त्नीच्या नातेवाईकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या शिवीगाळमुळे अपमानित झाल्याने, पतीने टोकाचं पाऊल उचललं. पतीने थेट विषारी द्रव्य घेऊन आयुष्य संपवलं.
नेमकं काय घडलं?
आष्टी तालुक्यातील पती अण्णाराव हे पत्नीला आणण्यासाठी भोजेवाडी या गावी गेले होते. सासुरवाडीला गेल्यावर सासरच्या लोकांनी अण्णाराव यांना शिवीगाळ केली. या शिवीगाळमुळे अण्णाराव यांना अपमानित झाल्यासारखं वाटलं. पत्नीच्या नातेवाईकांनी केलेली शिवीगाळ अण्णाराव यांना चांगलीच जिव्हारी लागली. अण्णाराव हे आपल्या घरी आले. त्यानंतर त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अण्णाराव यांनी विषारी द्रव पिऊन आत्महत्या केली.
आठ जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, या आत्महत्येनंतर अण्णाराव यांच्या कुटुंबाने आक्रमक पवित्रा घेतला. अण्णाराव यांच्या कुटुंबाने पत्नीसह नातेवाईकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. अण्णाराव यांच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर अंभोरा पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा तर दाखल झाला आहे. मात्र आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे कुटुंबीयांचं लक्ष लागलं आहे. अण्णाराव यांच्या आत्महत्येला जबाबदार धरुन कुटुंबावर कडक कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांची आहे.
कोल्हापुरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या
दरम्यान, तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) करवीर तालुक्यातील सांगरुळमध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या 16 वर्षीय नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्या सागर खाडे असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. दहा दिवसापूर्वी तिनं विषारी औषध प्राशन केलं होतं. दरम्यान, विषारी औषध प्राशन करण्यामाील कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.