Hingoli Crime News: महाआयटीच्या (MahaIT) वतीने बेरोजगार तरुणांना आधार कार्ड नोंदणी केंद्र चालवण्यासाठी दिले जातात. या केंद्रावर नागरिकांचे नव्याने आधार कार्ड तयार करणे, दुरुस्ती करणे आणि अपडेट करण्याचं काम केलं जातं. परंतु हेच आधार कार्ड नोंदणी केंद्र तुम्हाला देतो, असं म्हणून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याने व्याजाने पैसे काढून फसवणूकदारला दिल्याने आता काही तरुणावर फाशी घेण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया दिलकी आहे. अशातच हे प्रकरण उजेडात आल्याने जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

व्याजाने पैसे काढून दिल्याने तरुणावर फाशी घेण्याची वेळ 

हिंगोली जिल्ह्यांमध्ये महाआयटीचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांनी आधार कार्ड नोंदणी केंद्र मिळवून देतो, अस आश्वासन देऊन बेरोजगार तरुणांच्या कडून लाखो रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  जिल्हाभरामध्ये महा आयटीच्या वतीने वेगवेगळ्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आधार कार्ड नोंदणी केंद्र दिले जातात,  त्यासाठी अगोदर एक परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेत पास झाल्यानंतर आधार कार्ड नोंदणी केंद्राचा ताबा या तरुणाकडे दिला जातो.  परंतु हे नोंदणी केंद्र देण्यापूर्वी सागर भुतडा हे संबंधित बेरोजगार तरुणांकडे  पैशाची मागणी करत असतात. असाच प्रकार हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार तरुण बालाजी कोंघे यांच्यासोबत सुद्धा घडला आहे. 

तुला आधार कार्ड नोंदणी  केंद्र  मिळवून देतो तू मला एक लाख रुपये दे, अशी ऑफर सागर भुतडा यांनी बालाजी कोंघे  यांना दिली. कामाची गरज असल्याने बालाजी यांनी या ऑफरला समर्थन दिले आणि जवळ पैसे नसल्याने व्याजानं पैसे घेऊन  भुतडा यांना 50 हजार रुपये फोन-पे द्वारे पाठवले. त्यानंतर वारंवार भुतडा यांनी सांगितलेल्या फोन पे नंबर वर बालाजी यांनी वेगवेगळी रक्कम पाठवली, अशी एकूण 98 हजार रुपये रक्कम पाठवली. त्यानंतर प्रत्येक महिन्याला 2200 रुपये  द्यावे लागतील, या अटीसह बालाजी यांना एक आधार कार्ड नोंदणी संच देण्यात आला. परंतु आधार कार्ड  नोंदणी संच चार महिने उलटूनही ऍक्टिव्हेट होत नसल्याने बालाजी यांनी तो आधार नोंदणी संच औंढा नागनाथ येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये सुपूर्त केला. 

त्यानंतर हा आधार कार्ड नोंदणी संच मिळवण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत, हे कळल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं बालाजी कोंघे यांच्या लक्षात आलं.   त्यावरून त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार देत याप्रकरणी महाआयटीचे जिल्हा समन्वयक भुतडा यांच्याकडून माझी फसवणूक झाली, असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे बालाजी कोंघे यांच्याप्रमाणेच   जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांची अशाच पद्धतीनं फसवणूक करून सागर भुतडा यांनी लाखो रुपयांची माया जमवली आहे.

..अन्यथा मला जिल्हाधिकारी कार्यालयात फाशी घ्यावी लागेल 

बेरोजगार राहण्यापेक्षा  आपल्या हाती काहीतरी काम मिळते या अपेक्षेने अनेक बेरोजगार तरुण  भुतडा यांच्या जाळ्यात अडकत जात आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून सागर भुतडा यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा मला जिल्हाधिकारी कार्यालयात फाशी घ्यावी लागेल,  अशी प्रतिक्रिया बालाजी कोंघे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे  

दरम्यान, या प्रकरणाची हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गंभीर दखल घेतली असून  या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एक चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. आठवडाभरामध्ये त्या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या