Pakistan's delegation in Moscow : भारतासोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान, पाकिस्तानचे (India vs Pakistan) एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ मंगळवारी रशियाची (Russia) राजधानी मॉस्को येथे पोहोचले. या शिष्टमंडळाने रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेतली आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे एक वैयक्तिक पत्र राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सुपूर्द केले. पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे विशेष सहाय्यक सय्यद तारिक फतेमी यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ होतं. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने TASS ने पाकिस्तानी दूतावासाचा हवाला देत पत्र सुपूर्द केल्याची पुष्टी केली. मात्र ही भेट अशा वेळी घेतली जात आहे, जेव्हा रशिया आणि भारत यांच्यातील सुरक्षा सहकार्य आणि राजकीय समन्वय सातत्याने वाढत आहे.
लावरोव्ह यांना देण्यात आली दक्षिण आशियातील परिस्थितीची माहिती
बैठकीदरम्यान, पाकिस्तानी शिष्टमंडळाने रशियाला दक्षिण आशियातील परिस्थितीची माहिती दिली. दोन्ही देशांमधील विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी थेट संवादाची गरज असल्याचे लावरोव्ह यांनी सांगितले. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, संवाद हा विश्वास निर्माण करण्याचा मार्ग आहे.
रशियासोबत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याची इच्छा
सय्यद तारिक फातिमी यांनीही पंतप्रधान शरीफ यांच्याकडून पुतिन यांना शुभेच्छा दिल्या आणि ऊर्जा, वाहतूक, व्यापार अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याची पाकिस्तानची इच्छा व्यक्त केली. 7 मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावाला सुरुवात झाली. प्रत्युत्तरादाखल, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर सर्जिकल स्ट्राईक (Operation Sindoor) केले.
यानंतर, पाकिस्तानने 8, 9 आणि 10 मे रोजी भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय लष्कराने या प्रयत्नांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 10 मे रोजी, दोन्ही देशांच्या डीजीएमओ (सैन्य ऑपरेशन्सचे महासंचालक) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, लष्करी कारवाया थांबवण्याचा करार झाला.
भारताविरुद्ध जागतिक पाठिंबा मिळविण्यासाठी पाकिस्तानचा प्रयत्न
पाकिस्तानने गेल्या महिन्यात घोषणा केली होती की ते भारतासोबतच्या चार दिवसांच्या संघर्षाची बाजू आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये तज्ञांचे पथक पाठवेल. मॉस्को भेट ही याच रणनीतीचा एक भाग मानली जात आहे. अशातच भारतीय शिष्टमंडळाचा रशिया दौराही चर्चेत आहे. हे देखील उल्लेखनीय आहे की काही दिवसांपूर्वी द्रमुक खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संसदीय शिष्टमंडळाने रशियाला भेट दिली होती. या दरम्यान, प्रतिनिधींनी रशियाला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल माहिती दिली आणि आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला.
इतर महत्वाच्या बातम्या
