Hingoli Crime News : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सुकळी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुकळी येथील कृष्णा चंद्रवंशी या 28 वर्षीय तरुणाने कळमनुरीचे तहसीलदार, निवृत्त तलाठीसह त्यांच्या पत्नीच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. मृत कृष्णा चंद्रवंशी या तरुणाने आज आत्महत्या (Suicide) करत आपले आयुष्य संपवले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी मयत कृष्णा चंद्रवंशी यांनी एक व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला आहे. ज्यामध्ये आत्महत्येचे कारण काय आणि आत्महत्यास कोण कोण जबाबदार आहे, याचा स्पष्ट उल्लेख त्यात केला आहे. हा संपूर्ण प्रकार उजेडात येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा (Crime News) अधिक तपास सध्या करत आहेत.
तहसीलदार अन् निवृत्त तलाठ्यांच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचं पाऊल
या घटनेतील मयत कृष्णा चंद्रवंशी यांच्या वडिलांची चार एकर शेती ईसापुर धरणामध्ये सरकारने अधिगृहीत केलीय. ती शेती धरणातील पाणी ओसरल्यानंतर गाळपेरा करण्यासाठी मूळ मालक असलेल्या चंद्रवंशी यांना किंवा त्यांच्या वारसदारांना द्यावी, अशी मागणी कृष्णा चंद्रवंशी यांनी केली होती. परंतु तहसीलदार यांनी गाळपेऱ्यासाठी जमीन मागण्याच्या कारणावरून वारंवार खोटे गुन्हे दाखल केले. सोबतच तहसीलमध्ये बोलवून आर्थिक आणि मानसिक त्रास दिला, असा आरोप या व्हिडिओमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी कृष्णा चंद्रवंशी यांनी केला आहे. हा संपूर्ण प्रकार उजेडात येताच किरकोळ वाद विकोपाला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून चंद्रवंशी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
......तोपर्यंत मृतदेहाचा अंत्यविधी केला जाणार नाही!
या आत्महत्येस तहसीलदार आणि निवृत्त तलाठी यांची पत्नीसह आणि मुलगा जबाबदार असल्याचे कृष्ण चंद्रवंशी याने या व्हिडिओ मध्ये म्हटले आहे. तहसीलदार यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचा अंत्यविधी केला जाणार नाही आणि मृतदेह ताब्यात सुद्धा घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मयत कृष्ण चंद्रवंशी यांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या प्रकरणी आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाचा बातम्या