पुणे : मग्रुरी दाखवत पुण्यातील रस्त्यावरच लघुशंका करणारा, अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा आता जमिनीवर आला आहे. आपल्याकडून चुकीचं कृत्य झालं असून त्याची आपण जाहीर माफी मागतो असं त्याने म्हटलं आहे. आपल्या या कृत्यामुळे कुटुंबाला त्रास देऊ नका असंही त्याने म्हटलंय. गौरव आहुजाचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये त्याने माफी मागितली आहे. गौरव आहुजा लवकरच पोलिसांना शरण जाणार आहे. तशी माहिती त्याने व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
एकीकडे जग महिला दिन साजरा करत असताना दुसरीकडे पुण्याच्या शास्त्रीनगर चौकात भर सकाळी संतापजनक प्रकार घडला. पुण्यात गौरव आहुजा या मद्यधुंद तरूणाने भरचौकात अश्लील प्रकार केला. सिग्नलवर गाडी उभी करून गाडीच्या बाहेर येत त्याने लघुशंका केली. एमएच 12 आरएफ 8419 या रजिस्ट्रेशन नंबरच्या बीएमडब्ल्यू 6 सीरिज या लक्झरी गाडीतून आलेल्या तरूणाने श्रीमंतीचा माज दाखवत, कोणताही विधीनिषेध न बाळगता भर रस्त्यात दिवसाढवळ्या लघूशंका केली. विशेष म्हणजे जाब विचारायला गेलेल्यांसमोर पुन्हा त्याने हे विकृत कृत्य केलं.
गौरव आहुजाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा मित्र भाग्येस नीबजीया सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
नेमकं काय घडलं?
सुनील शिरसाट या व्यक्तीने गौरव आहुजाचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ शुट केला आहे. तर व्हिडीओमध्ये दिसणारी बीएमडब्ल्यू कार MH-12AF 8419 ही मनोज आहुजा नावाच्या व्यक्तिच्या नावावर आहे. व्हिडीओ शूट केलेल्या सुनील शिरसाट यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, "आता आपण शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत, या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. एक बीएमडब्ल्यू कार चालवणारा आला होता. त्याने अश्लील चाळे केले, भर रस्त्यात त्याने लघुशंका केली. तो आणि त्याचा मित्र होता. मी त्यांना विचारल्यानंतर ते फुल स्पीडने वाघोलीकडे गेले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की दोघे दारू पिऊन गाडी चालवत आहेत. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे."