Gadchiroli News गडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून अमरावतीच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात बसचालकासह दोन महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. आलापल्ली ते आष्टी मार्गावरील धंनूर फाट्याजवळ ही घटना आज दुपारच्या सुमारास घडलीय. धंनूर फाट्यावरील वनविभागाच्या नाक्याजवळ समोरून येत असलेल्या वाहनाला साईड देण्याच्या दरम्यान बाजूला खोल भाग असल्याचा अंदाज बस चालकाला न आल्याने बस अचानक पलटली.


या अपघातील जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये बसचालकाची मुलगी देखील प्रवास करत होती. यात तिला देखील दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अहेरी आगारचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. 


रस्त्यातील खड्याचा अंदाज न आल्याने बस पलटली 


अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच-07 सी 9463 ही अहेरी वरून 27 प्रवासी घेऊन नेहमीप्रमाणे अमरावतीच्या दिशेने जात होती. दरम्यान, धंनूर फाट्यावरील वनविभागाच्या नाक्याजवळ समोरून येत असलेल्या वाहनाला साईड देण्याच्या दरम्यान बाजूला खोल भाग असल्याने बस अचानक पलटली. हा अपघात इतका भीषण होता की बस कडेला जाऊन अक्षरक्ष:आडवी झाल्याचे बघायला मिळाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र यातील काही प्रवाश्यांना गंभीर दुखापत झाली आहे.


या घटनेची माहिती मिळताच अहेरी आगाराच्या व्यवस्थापकांनी  घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनीही एकच गर्दी केल्याचे बघायला मिळाले.  


पोलिसांकडून साडेसात लाखांची दारू नष्ट


विविध गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला 7 लाख 50 हजाराचा दारूसाठा अखेर न्यायालयाच्या आदेशावरून यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांनी नष्ट केला. गेल्या काही वर्षात दारूबंदी कायद्या अंतर्गत विविध कारवाया केल्या आहेत. यामध्ये  अवधूतवाडी पोलिसांनी आजपर्यंत अनेक दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखोंची दारू जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात काही प्रकरणे सुरु होती.


न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणांचा न्यायालयाने निकाल लावला. तसेच पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट करण्याचे आदेशही दिले. त्यामुळे अवधूतवाडी पोलिसांनी विविध गुन्हात जप्त केलेला 7 लाख 50 हजार रुपयांचा दारू साठा खड्यात टाकून नष्ट केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या