यवतमाळ : एका भावानं आपल्या बहिणीला फसवलं असून तिची थोडी थोडकी नाहीतर तब्बल 27 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. भावानं बनावट सह्या करुन ही फसवणूक केल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर बँक मॅनेजरसह नऊ जणांविरोधात पुसदच्या वसंतनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाईन शॉपच्या मालकाच्या बँकेमधील सह्या बदलून 27 कोटी रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणात बँक मॅनेजर, अकाउंटंट तसेच इतर 7 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


यवतमाळमधील पुसदच्या श्रीरामपूर येथील रहिवासी नंदकिशोर जैस्वाल यांची बहीण अमरावतीत राहते. जयश्री अजयकुमार मोरया यांचे पुसदच्या वसंतनगर परिसरामध्ये वाईन शॉपचे दुकान होते. त्यावर नंदकिशोर जैस्वाल हा नोकरनाम्यावर काम करीत होता. वाईन शॉप दुकान मालक जयश्री या अमरावती येथे राहत असल्याने दुकानाचे सर्व व्यवहार माल घेणे-देणे विकण्याचं कामकाज नंदकिशोर आणि त्याची पत्नी रश्मी जैस्वाल हे पाहत होते. दरम्यान जयश्री मोरया यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी नंदकिशोर यांच्याकडून पैसे मागितले होते. त्यावरून दोघा बहिण-भावंडांमध्ये वाद निर्माण झाला. हे प्रकरण साध्यासुध्या वादावर न थांबता थेट पोलीस स्थानकापर्यंत पोहोचलं. घटनेबाबत पुसदच्या वसंतनगर पोलीस स्टेशनला काही दिवसांपूर्वी या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


त्यानंतर नंदकिशोर जैस्वाल आणि त्यांची पत्नी रश्मी आणि भाऊ रवी जैस्वाल यांच्यासह इतर नातेवाईक आणि अकोला जनता को-ऑपरेटिव बँकेचे मॅनेजर तथा अकाउंटंट यांनी कट रचत जयश्री मोरया यांच्या बनावट सह्या करून चेकबुक आणणे, सह्या बदलणं अशाप्रकारे फसवणुकीचं काम केलं. या कामात बँक अधिकारी यांनी खातेदाराच्या स्वाक्षरीची शहानिशा न करता सही बदलण्यात सहकार्य केले.


यासोबतच आरोपींनी दुकानात मागवलेल्या मालाचे पैसे न देता फसवणुक करत बँकेतून काढलेल्या रकमेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला. ती रक्कम हडप केली. डीलरच्या रकमेच्या बदल्यात जयश्री मोरया यांच्या सहीचे चेक देऊन 27 कोटी पंचवीस लाख 34 हजार 860 रुपयांची मागील चार वर्षांमध्ये अफरातफर केल्याची तक्रार जयश्री अजय कुमार मोरया यांनी पुसदच्या वसंतनगर पोलीस स्टेशनला दिली आहे. नंदकिशोर जैस्वालसह इतर नातेवाईक आणि बँक मॅनेजर, अकाउंटंट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी दिली आहे. या प्रकरणाच्या अफरातफर बाबत चौकशी सुरु केली आहे. असंही वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :