सोलापूर : सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे. या सोशल मीडियाच्या गुन्हेगारीचे सर्वाधिक प्रमाण हे सायबर गुन्ह्यांचे आहेत. या आधी बँकेतून कॉल करतोय असे म्हणत अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. मात्र, आता या सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत तरुण. तरुणांना लैंगिक आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढलं जातं आणि ब्लॅकमेल करून पैसे उकळले जातात.
तुम्ही फेसबुक वापरताना अचानक एका अनोळखी महिलेची रिक्वेस्ट येते. तुम्ही रिक्वेस्ट स्विकारता, चॅटिंग होते, चॅटिंग वाढत जाते मग फेसबुकवरची ही चॅटिंग पोहोचते थेट वॉट्सअप पर्यंत. आधी सहज बोलणं होतं आणि मग सुरू होते गुन्हेगारी आणि या गुन्हेगारीला सर्वात जास्त बळी पडतायत ते तरुण. ऑडिओ कॉलनंतर व्हिडीओ कॉल केले जातात. या व्हिडीओ कॉलवर तरुणाला अश्लील कृत्य करण्यासाठी उत्तेजित केलं जातं आणि नंतर तेच व्हिडीओ पाठवून त्याला ब्लॅकमेल केलं जातं.
सोलापुरातील जवळपास 3 ते 4 तरुणांची अशी फसगत झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, आपल्या इज्जतीला घाबरून कोणीही पुढे यायला धजावत नाहीये. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या राज सलगर याने यासंदर्भात फेसबुक पोस्ट टाकली आणि जाळ्यात ओढला जाणारा एक तरुण समोर आला आणि त्याने संपूर्ण व्यथा मांडली.
'वेब सीरिज'च्या नावावर तरुणींची पॉर्नफिल्म बनवणाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या बेड्या
मागील दोन ते तीन दिवसांपासून या तरुणाला ब्लॅकमेलचे कॉल येत आहेत. सुदैवाने ह्या तरुणाने अद्याप कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना भीक घातली नाहीये. मात्र, या धमक्यांना कोणी बळी पडलंय का? हे समोर येऊ शकलेलं नाही. धमक्यांचा असाच एक फोन एबीपी माझाला हा पीडित तरुण मुलाखत देत असताना देखील आला होता.
सायबर गुन्हेगारीच्या विश्वात रोज नवनवीन गुन्हे घडत आहेत. यंत्रणासमोर या गुन्हेगारीला आळा घालण्याचं एक मोठं आव्हान आहे. मात्र, व्हर्च्युअल जमान्यात जगत असताना सावध राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर अशी फसगत होत असल्याचं लक्षात आलं तर थेट पोलिसात धाव घ्यायला हवी.