Jalgaon News: जळगाव : जळगावच्या (Jalgaon) भुसावळ (Bhusawal) शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये माजी नगरसेवकाचा समावेश असून त्यांचा एक सहकारी देखील या गोळीबाराच्या घटनेत मृत्युमुखी पडला. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड भागात कारमधून जात असलेल्या चौघांवर अज्ञातांनी गोळीबार केला. हल्ल्यामागील मागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटनेनंतर संपूर्ण भुसावळ शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. 


भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे (Santosh Barse) यांच्यासोबत इतर तिघे कारमधून जात असताना त्यांच्या कारवर अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसेंसह आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 


नेमकं काय घडलं? 


भुसावळ शहरात जुना सातारा रोडवरून संतोष बारसे हे कारमधून जात असताना मरिमाता मंदिर परिसरजवळ कार येताच दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांचेवर अंदाधुंद गोळीबार केल्यानं ते कार मध्येच जागेवर कोसळले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरही दोघांना मृत घोषित केलं होतं. या घटनेची माहिती भुसावळ शहरात वाऱ्यासारखी पसरली, काही वेळातच हजारो लोक खासगी रुग्णालयाच्या आवारात एकत्र जमले. वाढता जमाव आणि तणाव वाढत असल्याचं लक्षात घेत पोलिसांनी दोघांचे मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत. 


घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीनं संपूर्ण भुसावळ शहरात नाकाबंदी करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आली नसली, तरी जागोजागी पोलीस छापेमारी करत त्यांचा शोध घेत आहेत. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.