Nagpur Crime News : खासदार क्रीडा महोत्सवात राडा करून क्रिकेट सामन्यातील पंच आणि आयोजकांना मारहाण केल्याप्रकरणी अखेर भाजप नेते मुन्ना यादव यांची मुलं करण आणि अर्जुन या दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार होऊ नये, यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराकडून करण्यात आला आहे. मात्र अखेर तीन दिवसांनंतर शनिवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आता मुन्ना यादव यांच्या मुलांविरोधात पोलीस काय कारवाई करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांनी तुफान राडा घातला होता. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत विविध ठिकाणी स्पर्धा घेण्यात येत आहेत. छत्रपती नगर क्रिकेट मैदानावर क्रिकेटचे सामने सुरू होते. 


प्रकरण नेमकं काय? 


गुरुवारी दुपारी एक वाजता एलेव्हन स्टार आणि खामला स्टार यांच्यात सामना सुरू होता. त्याचवेळी भाजप नेते मुन्ना यादव याची मुलं करण, अर्जुन आणि त्यांच्या साथीदारांनी 'थ्रो बॉल'बाबत पंचाच्या निर्णयावर वाद घालण्यास सुरुवात केली. हे पाहून सामन्याचा स्कोअरर अमित होशिंगने करणला सामन्याच्या नियमांचा हवाला दिला. हे पाहून करणने अमितला शिवीगाळ करत त्याच्यावर बॅटने हल्ला केला. याशिवाय त्यांनी तेथील पदाधिकाऱ्यांना देखील धमकावले. हा प्रकार झाल्यावर अमितने शुक्रवारी दोनदा प्रतापनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळा तो तिथून परतला, असा दावा तक्रारदार अमित यानं केलं आहे. अखेर वैद्यकीय तपासणी झाल्यावर शनिवारी सकाळी तो तक्रार देण्यासाठी गेला. पोलिसांनी त्याची तक्रार घेत दोघांविरोधातही भादंविच्या कलम 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांविरोधात पुढील काय कारवाई होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणातील पुराव्यांची शहानिशा करून पुढील पावले उचलण्यात येतील, असे प्रतापनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश काळे यांनी स्पष्ट केले.


तक्रारदाराच्या सुरक्षेचं काय?


मुन्ना यादव आणि कुटुंबीय यापूर्वीही विविध प्रकरणात मारहाण आणि दादागिरीच्या घटनांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार करण्याची हिंमत तक्रारदाराने दाखविली असली तरी त्याच्या सुरक्षेचा मुद्दा निश्चित उपस्थित होत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी काही पावले उचलण्यात येणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.


पक्षाची प्रतिमा डागाळेल म्हणून होऊन जाऊ द्या...


दरम्यान, या प्रकरणामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात खळबळ उडाली आहे. मुन्ना यादवविरोधात अनेक जण 'ऑफ द रेकॉर्ड' भावना व्यक्त करत आहेत. या प्रकरणात सारवासारव झाली तर पक्षाची प्रतिमा डागाळेल. त्यामुळे नियमानुसार कारवाई होऊ द्यावी, अशी अपेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात या; श्याम मानव यांचे बागेश्वर बाबांना चॅलेंज