Bageshwar Baba Shyam Manav Argument : अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराजांनी त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं 30 लाख रुपयांचं बक्षीस आव्हान दिलं होतं. यानंतर धीरेंद्र महाराजांनी त्यांच्या रायपूर येथील दरबारात आव्हान स्वीकारलं. तसेच रायपूरला दरबारात या, अशी अट ठेवली. यावर श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली असून 'तुमच्याकडे दिव्यशक्ती असेल तर तुम्ही नागपूरला या, रायपूरला बोलवून भक्तांच्या आड कशाला लपता, धमक असेल तर नागपुरात येऊन तुमची शक्ती सिद्ध करा' असे चॅलेंज बागेश्वर बाबांना श्याम मानव यांनी दिले आहे. रविभवन येथे 'एबीपी माझा'शी त्यांनी संवाद साधला.
पुढे श्याम मानव म्हणाले, 'बागेश्वर बाबांनी चॅलेंज स्वीकारलं हेच मुळात खोटं आहे. मी त्यांना चॅलेंजबद्दल स्पष्टपणे कळवलं आहे. मुळात भक्तांसमोर या कसोट्या करणे शक्य नाही. याबद्दल त्यांच्या व्हिडीओमध्येच अनेक गोष्टी स्पष्ट दिसून येतात. बाबांकडे दिव्यशक्ती असल्याचे सिद्ध झाल्यास ती सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र वैज्ञानिक कसोटीतून त्यांनी ते करावं, आपली एवढीच मागणी असल्याचे ते म्हणाले.'
बागेश्वर बाबांना 30 लाख रुपये देऊ
श्याम मानव यांनी नागपुरात यावं, त्यांच्यासमोर आम्ही नवे दहा लोकं उभे करु. तसेच त्यांच्याबद्दल बाबांनी सर्व माहिती सांगावी. तसेच दरबारमध्ये ज्या प्रकारे ते भक्तांच्या घरी कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, याबद्दल सांगतात. तसेच दुसऱ्या खोलीत आम्ही ठेवलेल्या वस्तूंबद्दल सांगावे. त्यांनी 90 टक्के जरी खरी माहिती दिली तर त्यांना अखिल भारत अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे 30 लाख रुपये देण्यात येतील असेही यावेळी श्याम मानव यांनी स्पष्ट केले.
तर मी महाराजांच्या पाया पडणार
बागेश्वर बाबांनी प्रामाणिकपणे आणि वैज्ञानिक कसोटीतून त्यांच्यातील 'दिव्यशक्ती' सिद्ध केल्यास मी त्यांच्यावर केलेले आरोप मागे घेणार. तसेच त्यांच्याबद्दल बोलल्याबद्दल त्यांच्या पाया पडून माफी मागणार असल्याचेही यावेळी मानव यावेळी सांगितले.
...म्हणून नागपुरात दिलं चॅलेंज
बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र महाराजांनी नागपुरात येऊन दिव्यशक्ती असल्याचे सांगितले. भक्तांसमोर विविध चमत्कार दाखवल्याचा दावा केला. तसेच एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल सर्व माहिती चेहरा बघून सांगितल्याचा दावा केला. कोणाच्या घरी काय ठेवले आहे, कुठे ठेवले आहे, हेही सांगितले. त्यामुळे त्यांना नागपुरात येऊन 'दिव्यशक्ती' सिद्ध करण्याचे चॅलेंज दिल्याचे ते म्हणाले.
ही बातमी देखील वाचा...