Nagpur News : लूटमार आणि चोरी प्रकरणात सीताबर्डी पोलिसांना (Nagpur Police) हवा असलेला फरार गुंड अजीम बेग उर्फ आबू यानेच पोलिसांची वाहने पेटवल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. पोलीस वारंवार घरी यायचे म्हणून आबूनेच संतापाने वाहने जाळली असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. कुख्यात आबूवर खून, हल्ला, लूटमार आणि शस्त्र बाळण्याचे गुन्हे दाखल आहेत.
आबू हा फरार होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस त्याच्या घरी आणि परिसरात गस्त घालत होते. पोलीसांचे पथक त्याच्या घरीही धडकत असल्याने तो संतप्त होता. त्यामुळे संतापातून त्याने वाहने पेटवल्याची कबुली दिली. 24 वर्षीय आबूला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास अमरावती मार्गावरील (Amravati Road) वसंतराव नाईक झोपडपट्टी येथील पोलीस चौकीत पोलिसांनी पार्किंग केलेल्या तीन दुचाकींना आबूने आग लावली होती. आगीत चौकीच्या खिडक्यांचे पडदे जळाले होते. वेळीच पोलीस कर्मचारी पोहोचल्याने चौकी आगीपासून वाचली होती. सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने आरोपींचा सुगावा लागत नव्हता. पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत असताना वसंतराव नाईक झोपडपट्टीतील आबू याच्यावर संशय आला. त्याच्याविरोधात खून, हल्ला, लूटमार आणि चोरी असे गुन्हे दाखल आहेत. यात त्याला तडीपार करण्यात आले होते. त्याने काही दिवसापूर्वी उत्तर अंबाझरी मार्गावरील झाडीत एका दाम्पत्याला लुटले होते. तो पोलिसांना लुटमारीच्या दोन आणि एका चोरीच्या प्रकरणात हवा होता. पोलीस त्याच्या मागावर होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या घरी जाऊन शोध घेत होते.
आगीच्या घटनेच्या दिवशीच म्हणजे 5 नोव्हेंबर रोजी पोलीस त्याच्या घरी धडकले होते. मात्र पोलिसांना पाहून तो घराच्या मागच्या दाराने पळाला होता. रात्री 1.45 च्या सुमारास तो घरी परतला. तेव्हा तुझ्यामुळे पोलीस वारंवार घरी येत असल्याचे म्हणत त्याला आईने फटकारले होते. आईने फटकारल्याने आबू संतप्त झाला. पोलिसांना धडा शिकवण्याच्या हेतूने वस्तीतील पोलीस चौकीत आला. पेट्रोल टाकून उभ्या असलेल्या वाहनांना आग लावली. पोलीस चौकीत पेटवण्याचाच त्याचा हेतू होता. मात्र अधिक वेळ थांबलो तर पकडले जाऊ या भीतीने तो काही वेळात निघून गेला. घटनेनंतर तो वस्तीत न आल्याने पोलिसांना संशय आला. तपासानंतर गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. सध्या त्याला लुटमार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
अशी घडली होती घटना...
पोलिसांच्या वाहनांना आग लागल्याची माहिती एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोन करुन घटनेची माहिती दिली. बिटवर निघालेले पोलिस चौकीत परतले. तोपर्यंत तिन्ही वाहनांनी पेट घेतला होता. दरम्यान, अग्निशमन विभागाचे एक पथकही घटनास्थळावर पोहोचले. मात्र, तोपर्यंत तिन्ही वाहने पूर्णतः जळून खाक झाले होते. पोलीस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, मात्र परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आबूची ओळख पटवली. वसंतराव नाईक झोपडपट्टी यापूर्वी भुरु हत्याकांडावरुन चर्चेत राहिली आहे. या हत्याकांडानंतर परिसरात पोलिस चौकी उघडण्यात आली. बिटशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी येथूनच गस्तीवर निघतात.
हेही वाचा