Kalyan Crime News : पोलीस ठाण्याच्या शौचालयाच्या खिडकीतून पळ काढलेल्या आरोपीला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी (Kalyan Railway Police) पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत चौकशीसाठी असलेला आरोपीनं लघुशंका करण्याच्या बहाणा केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला पोलीस ठाण्याच्या कोठडीतून बाहेर काढून पोलीस बंदोबस्तात शौचालयात नेले होते. मात्र तो शौचालयाच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून त्यामधून पळून गेला. मात्र गस्तीवरील पोलिसांनी त्याचा उल्हासनगरपर्यंत (Ulhasnagar) फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आहे. युवराज दिनकर सरतापे (वय 28) असं पुन्हा अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
शौचालयाची खिडकी तोडून पळला आरोपी
लोहमार्ग पोलीस (Railway Police) सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी युवराज सरतापे हा उल्हासनगर शहरातील लालचक्की भागात राहतो. एका गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्यातच त्याला शुक्रवारी, 2 जून रोजी दुपारच्या सुमारास पोलीस कोठडीतून चौकशीसाठी गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बाहेर काढले होते. याच संधीचा फायदा घेऊन त्याने लघुशंका आल्याचा बहाणा केला. त्यामुळे लोहमार्ग पोलीस ठाण्याबाहेरील शौचालयात पोलीस बंदोबस्तात शौचालयात नेले होते. त्यानंतर शौचालयाच्या बाहेर दोन रेल्वे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले.
आरोपीचा फिल्मी स्टाईल पाठलाग
मात्र, बराच वेळ गेल्यातरी आरोपी शौचालयाच्या बाहेर येत नाही म्हणून तैनात असलेल्या हवालदार जाधव आणि पठाण यांनी शौचालयाच्या दरवाजावर टकटक केली. मात्र त्यांना आतून प्रतिसाद आला नाही. त्याचवेळी त्यांनी शौचालयाच्या दरवाजा उघडा असता तो शौचालयाच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीची लोखंडी जाळी काढून, तसेच संरक्षित भिंतीवरील तार काढून आरोपी युवराजने भिंतीवरुन उडी मारून पळ काढला होता.
पोलिसांनी पुन्हा आरोपीला ठोकल्या बेड्या
याची चाहूल लागताच रेल्वे पोलिसांनी त्याचा उल्हासनगरमधील घरापर्यंत फिल्मी स्टाईल पाठलाग केला. पाठलाग करताना आरोपी रस्ते, गल्लीबोळातून पळून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. अखेर शुक्रवारी त्याला लालचक्की भागातील घराच्या परिसरातून शिताफीने अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या कोठडीतून पळाल्याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हवालदार प्रीतम मोहिते यांच्या तक्रारीवरुन आरोपी युवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.