नागपूरः महाविद्यालयात झालेल्या एका किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन विद्यार्थ्यांच्या एका गटाने धारदार शस्त्राने एका विद्यार्थ्याची (Murder of Student in Nagpur) निर्घृण हत्या केली. ही खळबळजनक घटना सेमिनरी हिल्स परिसरातील बालोद्यान परिसरात घडली. या प्रकाराने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
या हत्याकांडात दीपांशू पंडित (Dipanshu Pandit) (वय 20, रा. अजनी) हा आरोपी असून तो रायसोनी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. तर हर्ष गोवर्धन डांगे (Harsh Dange) (वय 22, रा. साईनगर, वाडी) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो वाडी परिसरात असलेल्या मॉर्डन कॉलेजमध्ये शिकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपांशू याचे महाविद्यालयातील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी भांडण झाले. ही बाब माजी विद्यार्थी असलेल्या अंकित कासार (रा. एमआयडीसी) याला कळली. त्यामुळे दीपांशूला दम देण्यासाठी अंकित कासार आणि हर्ष त्यांच्या काही मित्रांसह रायसोनी महाविद्यालयात (Raisoni College Nagpur) गेले होते. यावेळी अंकितने दिपांशूला सिनियरला मारशील का? असे म्हणत दो-चार झापड मारल्या. यावेळी दोघांचेही भांडण झाले. ते भांडण मिटल्यानंतर अंकित आणि हर्ष त्यांच्या मित्रांसोबत निघून गेले. दरम्यान सेमिनरी हिल्स (Seminari Hills) येथील चहाच्या टपरीजवळ ते बसून आपसात चर्चा करीत होते.
'मॅटर' झाला; मित्रही पोहोचले
दीपांशूने हा राग डोक्यात ठेऊन आपल्या काही मित्रांना एकत्र केले. यावेळी त्याला अंकित सेमिनरी हिल्स परिसरात आपल्या मित्रासह असल्याची माहिती मिळाली. तिथे दीपांशू याचे एसएफएस महाविद्यालयातील काही मित्र होते. त्यांना संपर्क साधून त्याने त्यांना बोलावून घेतले. याशिवाय आपल्या परिसरातील मित्र असे सात ते आठ जणांना बोलाविले होते.
रागाच्या भरात काढला काटा
दरम्यान हर्ष आणि त्याचा मित्र अंकित कासार (रा. एमआयडीसी) आणि इतर काही मित्र होते. यावेळी दिपांशू आणि त्याच्या साथीदारांनी हर्ष आणि त्याचा साथीदारांना घेरले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचे काही मित्र पळून गेले. काही वेळातच दीपांशू आणि त्याच्या मित्रांनी धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. हर्षच्या पोटात तर अनिकेतला मांडीला दुखापत झाली. हर्ष आणि अनिकेत यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवून हल्लेखोरांनी पळ काढला. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. मात्र तोपर्यंक हर्षचा जागेवरच मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविला. यावेळी अंकीतला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे फिरवत दीपांशूसह आठ जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
मित्रांची पोलिसांकडे धाव
सेमिनरी हिल्स परिसरात एकीकडे दीपांशू आणि त्याचे साथीदार हर्षला बेदम मारहाण करीत असताना काही मित्रांनी परिसरातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात धावत जाऊन त्यांना प्रकरणाची माहिती दिली. मात्र पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत हर्ष रक्ताच्या थारोळ्यात होता. आणि त्याचा मृत्यू झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या