मुंबई : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचं राज्य सरकार काय करत होतं असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.  फॉक्सकॅान प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, "गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांता आणि फॉक्सकॅान सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचं नुकसान झालं आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं."


दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार 


शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थवर होणार की नाही याबाबत संभ्रम असताना उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, "यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार. त्याबद्दल कोणताही संभ्रम ठेवू नका. त्यासाठी मुंबई महापालिकेमध्ये रिमांइंडर अर्जही देण्यात आला आहे."


शिवसेनेचा 21 तारखेला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. 


शिवसेना भवनच्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी काय आदेश दिलेत?



  • महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांना सोबत घेण्याचे आदेश.

  • नेस्को येथील पदाधिकारी मेळाव्याकरता शाखापातळीवरही तयारी करा

  • दसरा मेळाव्याबाबत मनात कोणताही संभ्रम ठेवू नका.

  • दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, मोठ्या प्रमाणात शिवतीर्थवर गर्दी जमवण्याचे आदेश.

  • उद्धव ठाकरे यांची विभाग प्रमुख व उपविभाग प्रमुखांना सूचना. 


शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. पण या वर्षी एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर त्यांनीही दसरा मेळावा घेण्याचं नियोजन केलं आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी आता उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय घेतला नाही.


एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर त्यांनी आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळावं यासाठी अर्ज केला आहे.