मुंबईः मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असलेल्या अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांड मधील आरोपी शाहरुख पठाण याच्यावर पाच कैद्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. 23 जुलै रोजी रात्री ही घटना घडली. कैद्यांवर वचक बसविण्यासाठी पठाणने अनेकवेळा दादागिरी केल्याची माहिती आहे. यावरुन कैद्यांमध्ये शाहरुख पठाणबद्दल राग असल्याची चर्चा आहे. संधी साधून त्याच्याच बराकमधील पाच कैद्यांनी शाहरुख पठाणला चांगलाच चोप दिला. प्रशासनाला माहिती मिळताच सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. एन. एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती देण्यात प्रशासनाकडून टाळण्यात येत आहे. या घटनेचे कारण मात्र पोलिसांकडून अद्याप अधिकृतरित्या सांगण्यात आले नाही आहे.
काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त पोस्टचे यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यात तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली होती.
दहा जणांना धमक्या
उमेश कोल्हे यांची अमरावतीत गळा चिरून हत्या झाली होती. या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यात ताब्यात घेतलेले आरोपी पीएफआयचे सदस्य असल्याची माहिती मिळत होती. उमेश कोल्हे हत्येच्या वेळी शहरातील 10 जणांना धमक्या आल्या होत्या. अनेकांनी या प्रकरणी व्हिडीओ बनवत माफीनामा दिला होता. यातील एकाने पोलिसांत तक्रार दिली होती.