Mumbai Crime News: मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या (Pushkar Shrotri) घरात मोठी चोरी झाली आहे. पुष्कर श्रोत्रीच्या घरातून मोलकरणीने 10 लाख 27 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 20 हजारांची रोकड चोरली. तिनं ही रक्कम तिच्या पतीकडे दिली होती. पुष्कर श्रोत्रीनं या प्रकरणी पती-पत्नीविरोधात विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरातून एका मोलकरणीनं 10.27 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 1.20 रुपये रोख चोरले आहेत. पुष्कर श्रोत्री यांनी उषा गांगुर्डे आणि भानुदास गांगुर्डे या दोन जणांविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


आधी पैसे चोरल्याचं उघड, त्यानंतर दागिन्यांवरही हात साफ केल्याचं समोर 


पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, विलेपार्ले पूर्व येथे राहणारा मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीकडे घरातील कामासाठी आणि त्याच्या वडिलांचा सांभाळ करण्यासाठी तीन मोलकरणी काम करत होत्या. त्यापैकी एक उषा गांगुर्डे (41) नावाच्या महिलेनं सुमारे 5 ते 6 महिने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत काम केलं आहे. तिने श्रोत्रीच्या घरातून 1 लाख 60 हजार रुपयांचे विदेशी चलन चोरलं. 22 ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी प्रांजल हिला उषा गांगुर्डे हिच्यावर संशय आला. त्यावेळी श्रोत्री कुटुंबानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली. पोलीस तपासादरम्यान तिनं पैसे चोरल्याचे कबुल करून पती भानुदास गांगुर्डे यांच्याकडे दिले. तिच्या पतीनंही चोरीचे पैसे मिळाल्याची कबुली दिली.


दुसरी घटना 24 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली, जेव्हा अभिनेत्याची पत्नी प्रांजल श्रोत्रीनं कपाटातून सोन्याचे दागिने काढले आणि त्यावेळी त्यांना काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. श्रोत्री कुटुंबियांनी सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या दागिन्यांच्या दुकानात नेले असता ते दागिने बनावट असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तपासादरम्यान उषा गांगुर्डे यांनी खरे दागिने चोरून त्याऐवजी सारखेच बनावट दागिने आणल्याचं उघड झालं. त्यामुळे पुष्कर श्रोत्री यांनी 26 ऑक्टोबर रोजी उषा गांगुर्डे आणि त्यांच्या पतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 34, 381, 406 आणि 420 अंतर्गत विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


4 तासांसाठी बुक केली OYO रूम, पण जोडपं बाहेर आलंच नाही, पोलिसांनी दार उघडताच..., नेमकं घडलं काय?