नागपूरः कुख्यात गुंड आबू खानला मदत केल्याचा ठपका असलेल्या लतिफ बाबूच्या अकस्मात मृत्यूमुळे ताजबाग परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लतिफची चौकशी केली आणि घरी आल्यावर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.


पोलिसांच्या मारहाणीमुळेच लतिफचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून मात्र असे काहीच झाले नसून त्याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा  दावा केला गेला आहे. घटनेची माहिती पसरताच लतिफ राहत असलेल्या ताजबाग परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून आबू खानची कसून चौकशी सुरु आहे. त्याला कुणी मदत केली होती, याबाबत पोलीस तपास करत आहेत. खान फरार असताना लतिफ बाबूने मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी लतिफला चौकशीसाठी सक्करदरा पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविले होते. त्यावेळी उपायुक्त नुरूल हसन हे नाईट राऊंडवर होते. मात्र लतिफ येताच ते अवघ्या 35 सेकंदात निघून गेले. त्यामुळे लतिफला दुसऱ्या दिवशी परत बोलविण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली. लतिफ साडेदहानंतर घरी पोहोचल्यावर काही वेळाने छातीत दुखायला लागले. लतिफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर नातेवाईक व परिसरातील नागरिक एकत्र आले व पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला.


मूत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने


लतिफ बाबूचा मृत्यू हा ह्रदयविकासाच्या झटक्यानेच झाला असून त्याच्या शरीरावर कुठलेही मारहाण केल्याच्या जखमा नाही. असा पोस्टमार्टम अहवाल प्राप्त झाला आहे. यावरुन पोलिसांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांनी केलेला आरोप बिनबुडाचा असल्याचे अहवालातून समोर आले आहे.


एसीपींनी चौकशी केलीः पोलिस


यासंदर्भात पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आबूने आपल्या बयाणात लतिफ बाबूकडून पैसे मिळाल्याचे सांगितल्याचे स्पष्ट केले. मकोकाच्या फरार आरोपीची मदत करणाऱ्या लतिफ बाबूला सक्करदरा एसीपींनी चौकशीसाठी 6 जून रोजी बोलविले होते. मात्र रात्र झाली असल्याने दिवसा लतिफला चौकशीसाठी बोलविण्याचे अधिकाऱ्यांनी निर्देश दिल्याची माहिती आहे. 7 जून रोजी नोटीस देऊन लतिफला 8 जून रोजी बोलविण्यात आले. सहायक आयुक्तांनी चौकशी करुन लतिफला घरी पाठविले होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी कुठलीही मारहाण केलेली नाही असा दावा पोलिसांनी केला आहे. यापूर्वीही लतिफ बाबूला ह्रदयविकाराचा झटका आलेला असल्याचीही चर्चा होती.