Chhota Rajan: अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) छोटा राजनच्या (Chhota Rajan) वाढदिवसानिमित्त मुंबईतील (Mumbai News) मालाड पूर्व (Malad) कुरार पोलीस ठाण्याच्या (Kurar Police Station) हद्दीत पोस्टर आणि बॅनर लावून कबड्डीचं आयोजन करण्यात आलं होतं. छोटा राजनच्या फोटोसह पोस्टर व्हायरल झाल्यानंतर लगेचच कुरार पोलिसांनी कारवाई केली आणि त्याच्याशी संबंधित असलेल्यांना ताब्यात घेतलं. याच प्रकरणी पोलिसांनी आता अटकेची कारवाई केली आहे. 


छोटा राजनचे बॅनर लावणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली. त्यानंतर पोलीस चौकशीत हे लोक छोटा राजनच्या नावानं हप्ता आणि खंडणी वसुलीचं कामही करत असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर त्या सर्व जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल (Extortion Case) करण्यात आला असून अटकेची कारवाई देखील करण्यात आली आहे. 


छोटा राजनच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धेसाठी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी लोकांकडून पैसे उकळण्याचे काम केलं असून कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी त्याची पावतीही दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी सांगितले की, व्यापाऱ्यानं आरोपीविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात पैसे उकळल्याची तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली असून छोटा राजनच्या नावावर या लोकांनी किती पैसे गोळा केले आणि त्यांचा छोटा राजनशी थेट संपर्क आहे का? याचा तपास सुरू आहे. कुरार पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 386, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्तानं मुंबईच्या मालाड पूर्व परिसरातील कुरारमध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कबड्डी स्पर्धेसाठी कुरार परिसरात पोस्टरबाजीसुद्धा करण्यात आली होती. या बॅनरबाजी विरोधात कुरार पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून काही जणांना ताब्यातही घेतलं होतं. सोशल मीडियावर हे बॅनर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यानंतर हे सगळे बॅनर्स पोलिसांनी काढून टाकले होते. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.