मुंबई : ड्रग्ज माफिया (Drug Case) ललित पाटीलचा (Lalit Patil) ताबा मिळाल्यानंतर पुणे पोलीस त्याला घेऊन पुण्यात दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांनी आजच ड्रग्स तस्कर ललित पाटीलला मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतले. अंधेरी न्यायालयाने आज परवानगी दिल्यानंतर पुणे पोलीस अखेर ललित पाटीलला घेऊन पुण्यात दाखल झाले.
पुणे पोलिसांनी आज आर्थर रोड कारागृहातून ललित पाटीलचा ताबा घेतला. ललित पाटील याच्यासह शिवाजी शिंदे आणि रोहित कुमार चौधरी हे आरोपी देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटीलने पलायन केले होते. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. अखेर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी त्याला बेंगळुरुवर अटक केली होती.
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी काहींना अटक केली आहे आणि त्यासोबतच ससूनचादेखील तपास सुरू आहे. मात्र हा तपास पुढे नेण्यासाठी ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणं गरजेचं होते. ललित पाटीलला कोण मदत करत होतं? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश होता. या संदर्भातील सगळी माहिती पुढे येणं गरजेचं आहे. त्यामुळे ललित पाटीलचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत होते. आता ललित ताब्यात आल्याने पुणे पोलीस त्याची सखोल चौकशी करणार आहेत. ललित विरोधात पुण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.
रोज नवी माहिती समोर...
ललित पाटील याला ज्यावेळी साकिनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळीदेखील त्याने मोठे खुलासे केले होता. मी ससूनमधून पळालो नाही मला पळवण्यात आलं आहे, असं तो म्हणाला होता. त्याच्या या दाव्यामुळो मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस , येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून व्यवस्थापक यांच्यावर संशयाची सुई वळली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहे. ललित पाटील प्रकरणात त्याला मदत करण्याऱ्यांच्या संख्येत रोज भर पडत आहे.
पोलीस मागावर असताना ललितचा नाशकात मुक्तसंचार
ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिक पोलीस, पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीस मागावर असताना देखील ललित पाटील नाशिकमध्येच कसा? त्याला कोणाचा राजकीय पाठींबा होता का? तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलनं नाशिकमधून पळ काढला. त्यानंतर इंदूरला गेला, तिथून तो सूरतमध्ये गेला आणि पुन्हा नाशिक धुळे औरंगाबाद करत कर्नाटकात प्रवेश केला. बंगळूरवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली.