ठाणे, डोंबिवली : बेडरूममध्ये सोबत पत्नी झोपली नसल्याच्या रागातून लग्नाच्या वाढदिवशीच पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना डोंबिवली पूर्वमधील म्हात्रेनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यानंतर पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील हल्लेखोर पती सुरेश पैलकर याच्या विरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना डोंबिवली पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात असलेल्या म्हात्रेनगर मधील एका इमारतीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लखोर पती डोंबिवली पूर्व भागातील राजाजी पथ परिसरात असलेल्या म्हात्रेनगर मधील एका इमारतीत 28 वर्षीय मुलासह राहतो. गेल्या दोन वर्षांपासून पत्नी आणि हल्लेखोर पतीमध्ये घरगुती वाद असल्याने त्यांचे पटत नव्हते. त्यामुळे पत्नी सुलोचना ही आपल्या माहेरी कर्नाटक येथे राहत आहे. त्यातच 30 ऑगस्ट रोजी या दाम्पत्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने पत्नी माहेरहून डोंबिवलीतील सासरच्या घरी आली होती. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर पती हा आपल्या बेडरूममध्ये रात्रीच्या सुमारास झोपण्यासाठी गेला होता. त्यावेळी पत्नी मात्र बेडरूममध्ये न जाता ती दुसऱ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली.
पतीने पत्नीला आपल्या बेडरूममध्ये सोबत झोपण्यासाठी सांगितले. मात्र पत्नीने नकार देताच, दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून हल्लेखोर पतीने घरातील धारदार सुरीने पत्नीवर वार केले. हे पाहून मुलगा भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आला असता, हल्लेखोराने त्यालाही मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर मुलाने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या त्याच्या आईला जवळच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी मुलगा सुरज (वय 26) याच्या तक्रारीवरून डोंबविली पोलीस ठाण्यात हल्लेखोर पतीवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करीत आहेत.
उसनवारीच्या वादातून नातेवाईक महिलेवर हत्या
दुसरीकडे डोंबिवलीतच काही दिवसांपूर्वी उसनवारीच्या वादातून नातेवाईक महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली. पैशांच्या उसनवारीच्या वादातून एकाने नातेवाईक महिलेच्या डोक्यात हातोडी मारून आणि मानेवर इंजेक्शन टोचून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. राजीव भुयान असं गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचं नाव आहे, तर ममताराणी सुभाष पात्रा असं जखमी महिलेचं नाव आहे. या प्रकरणी डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: