जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) सगळ्यात मोठं शहर असलेल्या जोहान्सबर्ग येथे एका 5 मजली इमारतीला आग (Fire) लागली. या भीषण आगीत जवळपास 73 जणांचा होरपळून मृत्यू झाला आणि 52 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली? हे अद्याप कळू शकलेलं नाही.  


अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण


अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या प्रयत्नांनंतर आग लागलेल्या भागात नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र अद्यापही इमारतीच्या खिडक्यांमधून धूर निघताना दिसत आहे. मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडल्याने यात अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. या आगीच्या घटनेमागचं कारण शोधलं जात आहे.


मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरुच


जोहान्सबर्ग एमरजन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे प्रवक्ते रॉबर्ट मुलाउद्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही इमारतीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याने मोठ्या संख्येने आपत्कालीन आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी आहेत. अग्निशमनदलाच्या जवानांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. सर्व लोकांना इमारतीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


जखमींना जवळच्या रुग्णालयांत केलं दाखल


आगीच्या दुर्घटनेतील जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. जोहान्सबर्गच्या मध्यभागी असलेल्या इमारतीला आग लागल्याने इमारत काळी पडली आहे आणि अजूनही धूर धुमसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारतीत 200 हून अधिक लोक असण्याची शक्यता आहे. ज्या बहुमजली इमारतीमध्ये आग लागली त्या इमारतीत जवळपास 200 बेघर लोक परवानगीशिवाय राहत होते.






बेघरांसाठी निवारा म्हणून होत होता इमारतीचा वापर


ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीचा वापर बेघरांसाठी निवारा म्हणून केला जात होता. इमारतीचा वापर काही प्रवासी लोकांकडूनही केला जात होता. ज्यांच्याकडे स्वत:चं घर नाही, असे लोक या इमारतीत राहत होते. या इमारतीत राहण्यासाठी कसल्याही प्रकारचा अधिकृत भाडे करारही झालेला नव्हता. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक या इमारतीत एकत्रितपणे राहत असल्याने मदत आणि बचाव कर्यातही अडथळा येत असल्याचं प्रवक्त्यांनी सांगितलं.


हेही वाचा:


Python: ऑस्ट्रेलियातील घरावर चढला तब्बल 16 फुटांचा अजगर; नागरिकांची तारांबळ, पाहा थरकाप उडवणारा व्हायरल व्हिडीओ