Trending News : आजकाल कोणत्या क्षुल्लक कारावरून नवरा-बायकोमध्ये भांडण होत असल्याचं दिसून येत. अशा छोट्या-छोट्या कारणामुळे वाद इतका वाढतो की, नात्यात दुरावा येतो. कधी-कधी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचल्याचंही अनेकदा समोर आलं आहे. आता पुन्हा एक अशीच विचित्र घटना घडली आहे आणि या वादाचं कारण बनलं 5 रुपयांचे कुरकरे. हो तुम्ही वाचताय ते खरं आहे. पाच रुपयांच्या कुरकुरे मुळे पती-पत्नीमध्ये भांडण झालं आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.


5 रुपयांच्या कुरकुरे वरुन नवरा-बायकोत भांडण


कुरकुरे यांच्या अवघ्या पाच रुपयांवरून नवरा-बायकोमधील वाद इतका वाढला की, प्रकरण लग्न मोडण्यापर्यंत पोहोचलं. पतीने पत्नीला कुरकुरेचे पाकीट आणलं नाही, त्यामुळे पत्नी एवढी संतापली की, ती सासरी सोडून थेट माहेरी गेली.  हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं. समुपदेशन केंद्रामध्ये दोघांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण काही निष्पन्न झालं नाही. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील शाहगंज मधील ही घटना समोर आली आहे. नवऱ्याने कुरकुरे आणले नाही म्हणून महिलेने पोलिसांत तक्रार केली आणि घटस्फोट मागितला आहे.


नवऱ्याने कुरकुरे आणले नाही, म्हणून बायको माहेर निघून गेली


एका तरुणीचं 2023 साली शाहगंज येथील तरुणासोबत लग्न झालं होतं. ही तरुणी आधीपासून कुरकुरे खायची शौकीन होती. लग्नानंतर पत्नीने कुरकुरे मागितले, पण पतीने तिला कुरकुरे आणून दिले नाहीत. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हे प्रकरण इतकं वाढलं की, पतीने पत्नीला मारहाणही केली. यामुळे संतापलेली पत्नी पतीचं घर सोडून माहेरी निघून गेली. याप्रकरणी पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली. 


पती-पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न


हे प्रकरण अखेर पोलिसांकडे पोहोचलं. पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवलं. शनिवारी नवरा आणि बायकोला कुटुंब समुपदेशन केंद्रात बोलावण्यात आलं. समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी या दोघांचं समुपदेशन केलं. यानंतर, डॉ.सतीश खिरवार यांनी सांगितलं की, दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तसं होऊ शकलं नाही. यानंतर दोघांनाही समुपदेशनासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. हे प्रकरण निवळण्याची शक्यता आहे.


लग्नाच्या सहा महिन्यांनंतर पतीचा वागणूक बदलली


समुपदेशक डॉ. सतीश खिरवार यांनी सांगितलं की, शहागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणीचे एक वर्षापूर्वी शाहगंज पोलीस स्टेशन हद्दीत लग्न झाले होते. पती चांदीचा कारागीर आहे. लग्नाआधीपासूनच तिला कुरकुरे खायला आवडत होते, असं बायकोचं म्हणणं आहे. लग्नानंतर सहा महिने पतीने आपली खूप काळजी घेतली, लाड पुरवले. पण, आता त्याची वागणूक बदलली असल्याचा आरोप तिने केला आहे.


पतीने काय सांगितलं?


महिलेला रोज कुरकुरे खाण्याची सवय होती. जंक स्नॅक खाण्याच्या तिच्या सवयीमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. या सवयीमुळे अनेकदा घरात वाद व्हायचे. गेल्या वर्षी या जोडप्याने गाठ बांधली आणि सुरुवातीच्या काही महिन्यांत सर्व काही सुरळीत सुरु होते. पतीने सांगितलं की, पत्नीचे दररोज जंक स्नॅक्स खाण्याचे वाढत्या व्यसनामुळे त्याची चिंता वाढली. याउलट पत्नीने दावा केला आहे की, पती तिला मारहाण करत असल्याने ती तिच्या पालकांच्या घरी गेली होती.