Gulabrao Patil जळगाव : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल 13 मे रोजी मतपेटीत बंद झाला आहे. तर अ,नेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाप्रती असलेली उदासीनता, उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा फटका इत्यादी कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालेले नाही.


असे असले तरी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात (Raver Lok Sabha Constitunecy) मतदानाची टक्केवारी काही अंशी वाढल्याचे चित्र आहे. या आकडेवारीवर समाधान व्यक्त करत मतदारांचा कौल महायुतीच्यांच बाजूने असून या दोन्ही मतदारसंघात आमचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बोलताना व्यक्त केला आहे.   


महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील -मंत्री गुलाबराव पाटील 


जळगाव आणि रावेरमध्ये वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की,नक्कीच मतदानाची टक्केवारी ही मागच्या तुलनेत यंदाही वाढलेली आहे. नवं मतदारांमुळेही मतदानाची ही टक्केवारी वाढली आहे. असे असताना नवीन मतदारांचा कौल आमच्या बाजूने राहिला आहे. महिलांचे अनेक प्रश्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सोडवले असून महिलांचा कल हा आमच्या बाजूने आहे. त्यामुळे मला शंभर टक्के विश्वास आहे की, आमच्या महायुतीच्या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून येतील. दोन्ही मतदारसंघात महिला उमेदवार असून महिलांचा मोठा कल हा मतदानासाठी दिसून आला. गेल्या वेळच्या तुलनेत सव्वा ते दीड टक्का मतदानात वाढ झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातलं महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात येईल, असा विश्वासही मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केला आहे.


रामदेववाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी- गुलाबराव पाटील 


जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथे 7 मे रोजी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. अपघातास जबाबदार असलेल्यांवर तातडीने अटकेची कारवाई करावी, या मागणीसाठी रामदेववाडी गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. रामदेववाडी येथील एका अंगणवाडी सेविकेसह एकूण चार जणांचा कारने धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याविषयी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, रामदेववाडी येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे.ग्रामस्थांची मागणीही रास्त आहे. मात्र, त्यातील संशयित देखील यात गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. मात्र तेथील ग्रामस्थांची मागणी होती की त्यांना अटक करून कारवाई करा. पण ते अस्वस्थ असतील तर त्यांच्यावर अटकेची कारवाई करता येऊ शकत नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणले.


इतर महत्वाच्या बातम्या