Dhule Crime News :धुळे शहरातील (Dhule City)नामांकित एलआयसी किंग म्हणून ओळख असलेल्या अवैध सावकार राजेंद्र बंब याच्या विविध बँकेतील खात्याची आर्थिक गुन्हे शाखेने तपासणी केली. त्याच्याकडे तब्बल दहा कोटी 72 लाख रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये विदेशी चलनही पोलिसांच्या हाती लागले असून तपास यंत्रणांनी एका बँकेत सहापैकी पाच लॉकर तपासले. त्यात कोट्यवधी रुपयांच्या नोटा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.


धुळे जिल्हा पोलिसांनी (Dhule Police) अवैध सावकारीच्या विरोधात कंबर कसली आहे. धुळे शहरातील राजेंद्र बंब (Rajendra Bamb) याच्या विरोधात त्यांच्याकडे काम करणाऱ्या दुसाने नामक व्यक्तीने गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे अवैध सावकारी विरोधात तक्रार दाखल केली होती.  या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या मालमत्तेची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसात सुमारे 15 कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांच्या हाती लागली असून काल केलेल्या बँकेच्या तपासणीत काही विदेशी चलनाच्या नोटा देखील पोलिसांच्या हाती लागली आहेत. राजेंद्र बंब याच्याकडे एवढी मालमत्ता असून देखील इतके दिवस आयकर विभागाचे लक्ष गेले कसे नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 


धुळे शहरातील मूळचा रहिवासी असणाऱ्या राजेंद्र बंब हा LICचा एजंट असून नागरिकांना कर्ज देण्याचे काम करतो मात्र कर्ज देताना त्यांच्या मालमत्तेचे कागदपत्र देखील तो स्वतः कडे घेऊन घेत असे. अनेकांनी कर्ज फिरल्यानंतर ही त्यांना त्यांच्या घराचे मूळ दस्तऐवज त्याने परत दिले नाहीत. त्याच्याकडे काम करणाऱ्या दुसाने नामक व्यक्तीने देखील राजेंद्र बंब याच्याकडून कर्ज घेतले होते. कर्ज देताना दुसाने यांच्याकडील घराचे मूळ दस्ताऐवज मागून घेतले होते. कर्ज फेडून देखील घराची मूळ कागदपत्रे देत नसल्याने दुसाने यांनी जिल्हा पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अधिक तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाबदारी देण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने राजेंद्र बंब याच्या घराची झाडाझडती घेत तसेच त्याच्या विविध बँकांमधील खात्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. तब्बल तीन दिवस आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या झाडाझडती नऊ कोटी दहा लाखांची रोकड सापडली. असून 6 कोटी 25 लाखांचे दागिने सापडले आहेत. तसेच मालमत्तेची कागदपत्रे देखील मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.

 

दोन दिवसात त्याच्या घराच्या घेतलेल्या झाडाझडती ते पाच कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली. तिसर्‍या दिवसाच्या चौकशी तब्बल पाच कोटी 13 लाख 44 हजार 530 रोकड मिळून आली असून सोबतच दहा किलो 563 ग्रॅम असे पाच कोटी 54 लाख किमतीचे सोने आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे. या सोबत सात किलो 621 ग्रॅम चांदी देखील जप्त करण्यात आली असून या सापडलेल्या मालमत्तेत सोन्याची 67 बिस्कीट आहेत. तसेच यात विदेशी चलनाच्या देखील नोटा आढळून आल्या असून सध्या आर्थिक गुन्हा शाखेकडून त्याच्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्याची चौकशी देखील केली जाणार आहे. गेल्या चार दिवसांपासून धुळे जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग राजेंद्र बंब यांची संपत्ती मोजत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राजेंद्र बंब हा जिल्ह्यामध्ये अवैध सावकारीचा धंदा करीत आहे. नागरिकांना कर्ज देताना त्याच्या घराकडील मूळ कागदपत्रे स्वतःजवळ ठेवून घेत त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याच्या अनेक बाबी समोर येत आहेत. आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांनी भीतीपोटी त्याच्याविरुद्ध कोणत्याही तक्रारी केल्या नव्हत्या मात्र त्याच्याकडे गेल्या दहा वर्षापासून काम करणाऱ्या दुसाने नामक व्यक्तीने याबाबत तक्रार केल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

कोण आहे राजेंद्र बंब


राजेंद्र बंब हा एलआयसी एजंट असून नागरिकांना व्याजाने कर्ज देतो. एलआयसी किंग मेकर म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. कोरोना काळात पोलीस मित्र म्हणून त्याने पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल त्याचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून देखील विशेष सत्कार झाला आहे. 


आयकर विभागाचे दुर्लक्ष

 

अवैध सावकारी विरोधात धुळे जिल्हा पोलिसांनी उचललेल्या कठोर पावला तर राजेंद्र बंब याच्यावर झालेल्या कारवाईनंतर गेल्या अनेक वर्षांपासून याकडे आयकर विभागाचे लक्ष कसे गेले नाही?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे. या कारवाईनंतर तरी आयकर विभाग अशा पद्धतीने काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल का हाच महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या




Hingoli : बनावट परवाना तयार करुन 'मुन्नाभाई'नं थाटला हॉस्पिटलचा गोरखधंदा, हिंगोलीतील प्रकार उघड