धुळे : स्थानिक गुन्हे शाखेने सध्या धुळ्यातील (Dhule Crime) गुटखा माफियांच्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. रविवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचत 27 लाख रुपयांची गुटखा तस्करी रोखली, तर धुळे शहरातील देवपूर भागातून तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईत धुळे पोलिसांनी एकूण तब्बल 30 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता अवैध्य गुटखा तस्करी करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.


गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई 


शिरपूरकडून धुळे मार्गे औरंगाबादकडे एक ट्रक महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला (Dhule Crime Branch) मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटेच्या सुमारास चाळीसगाव रोड चौफुली वरील एका हॉटेलजवळ सापळा रचला. त्यावेळेस पोलिसांना ज्या ट्रकवर संशय होता, त्या ट्रकला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र ट्रक ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला वाहन थांबून आपल्या एका साथीदारासह अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढला. सदर वाहनाची तपासणी केली असता या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि पान मसाला आढळून आला. या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसऱ्या कारवाईत तीन लाखांचा गुटखा जप्त 


दुसऱ्या एका कारवाईत धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विट भट्टी परिसरातील एक इसम आपल्या एका पत्र्याच्या गोडाऊन मध्ये लाखो रुपयांचा गुटखा ठेऊन आहे याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संशयित असलेला सलमान खान याच्या घराजवळच्या शेडची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल तीन लाख रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा हा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता अवैध्य गुटखा तस्करी करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कौतुक केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या :