Mira Road Bageshwar Dham Sarkar : मुंबईजवळील मीरा रोड (Mira Bhayandar) येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri ) यांच्या दिव्य दरबारावेळी चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला. या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमात सहभागी महिलांचे सुमारे 4 लाख 87 हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. शनिवारी (18 मार्च) मीरा रोड परिसरात बागेश्वर धाम सरकार (Bageshwar Dham Sarkar) धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबार सजला होता. बागेश्वर सरकारचं (Bageshwar Dham) दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे लाखो अनुयायी या कार्यक्रमाला पोहोचले होते. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रम सुरू झालेला आणि रात्री 9.30 वाजता कार्यक्रम संपला. 


बागेश्वर धामच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी


एकीकडे लोक कार्यक्रमस्थळ सोडून घराकडे निघाले होते. दुसरीकडे सुमारे 50 ते 60 जणांचा ताफा मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात करण्यात आला होता. बागेश्वर धामच्या कार्यक्रमात सामील होणाऱ्या बहुतांश महिला होत्या. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राशिवाय सोनसाखळीही चोरीला गेल्याचा या महिलांचा आरोप आहे.


दिव्य दरबारात सुमारे 5 लाखांचे दागिने चोरीला


बागेश्वर धामच्या कार्यक्रमावेळी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती आहे. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 36 महिलांनी मंगळसूत्र आणि गळ्यातील चैन चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांत दाखल केल्या आहेत. या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 87 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याची माहिती आहे. सध्या काही जणांची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे. 


मीरा रोड येथे दोन दिवसीय कार्यक्रम


मीरा रोड येथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 18 आणि 19 मार्च दोन दिवस धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी दिव्य दरबार सजला आणि रविवारी दुसऱ्या दिवशी आशीर्वाद आणि विभूती वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 


धीरेंद्र शास्त्री वादाच्या भोवऱ्यात


स्वत:ला दैवी शक्ती प्राप्त असून आपण सर्व लोकांची कोणत्याही संकटातून मुक्तता करु शकतो, असा धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा दावा आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या बाबांना विरोध दर्शवला आहे. बागेश्वर धाम हे बुवा धर्माच्या आडून अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या कार्यक्रमाच्या नावाखाली, जाहीरपणे अवैज्ञानिक दावे करत आहेत, असं अंनिसने म्हटलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Bageshwar Maharaj : कधी भुतांना पळवण्याचा दावा तर कधी दिव्य दृष्टीचा महिमा, कोण आहेत बागेश्वर महाराज उर्फ धीरेंद्र शास्त्री?